

कोल्हापुरात राहणारी प्रिया. वय पंचविशीच्या आत. कॉलेज करत काहीतरी साईड इन्कम मिळावा, एवढीच तिची इच्छा. एके दिवशी इन्स्टाग्राम स्क्रोल करताना तिच्या नजरेस एक जाहिरात पडली. ‘घरबसल्या कमवा 5,000 रुपये फक्त एका तासात. काहीही करण्याची गरज नाही, फक्त मोबाईल फोन असला की पुरेसे.’ आणि जाहिरातीत एका मोठ्या कंपनीचा लोगो होता. काय पाहिजे अजून?
तिने लगेच इन्स्टाग्राम जाहिरातीखाली दिलेल्या ‘रीड मोअर’वर क्लिक केले आणि पुढच्याच मिनिटाला तिच्या व्हॉटस्अपवर एक मेसेज आला. ‘हॅलो, मी किरण, कंपनीच्या एचआरटीमधून तुम्हाला मेसेज करते.’
समोरून व्यवस्थित मराठीत आणि इंग्लिशमध्ये बोलणे, सगळे प्रोफेशनलरीत्या. प्रियाला सांगण्यात आले, ‘तुमचे काम म्हणजे मॉलवर येणार्या ऑर्डर्स प्रोसेस करणे. तुम्हाला घरबसल्या दिवसाला तीन तास काम करावे लागेल. यातून तुम्हाला सोळा हजार रुपये मिळतील.’
मोबाईलवर एक-दोन क्लिक करून इतकी मोठी रक्कम मिळणार होती. यामुळे प्रिया भांबावून जाते. तितक्यात तिला सांगण्यात येते. सुरुवात करण्याआधी थोडी सिक्युरिटी डिपॉझिट द्यावी लागेल. काही पैसे गुंतवल्यास परत मिळतील, असेही तिला सांगितले जाते.
तिच्याकडून आधी फॉर्म फी म्हणून 999 रुपये घेतले जातात. ‘तुम्ही योग्य कँडिडेट आहात. पण वर्क लिमिट वाढवायची असल्यास तुम्हाला 10 हजार रुपये भरावे लागतील.’
चटकन तिने पैसे पाठवले. आता तुम्हाला वर्कऑर्डरच्या लिंक येण्यास सुरुवात होईल, असे तिला सांगण्यात आले. यानंतर तिला एक लिंक आली आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तिचे खाते रिकामे झाले. अचानक ती ज्या व्हॉटस्अप नंबरवरून एचआर टीमशी बोलत होती ते अकाऊंट ब्लॉक, इन्स्टाग्राम अॅड गायब आणि तो नंबर नॉट रिचेबल लागत होता.तिला काही कळण्याआधी सायबर चोरट्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून तिला गंडा घातला होता.
सध्या सोशल मीडियावर अशाप्रकारे मोठमोठ्या कंपन्यांचे फेक लोगो वापरून ‘वर्क फ्रॉम होम’च्या जाहिराती दिल्या जातात. त्या जाहिरातीमधील लिंकवर क्लिक करताच तुम्ही सायबर चोरट्यांच्या सापळ्यात अडकता.
मोठ्या ब्रँडचे नाव वापरून इन्स्टाग्राम/फेसबुकवर अॅड टाकली जाते. ‘फक्त मोबाईल’... ‘नो एक्सपीरियन्स’... ‘वर्क फ्रॉम होम’... असे शब्द जाहिरातीत वापरले जातात. सुरुवात थोड्या पैशांनी होते. मग हळूहळू वाढवत नेतात. एकदा का पैसे गेले की संपर्क संपतो. ना काम, ना परतावा.
1. कोणतीही कंपनी नोकरीसाठी आधी पैसे घेत नाही.
2. स्पॉन्सर्ड पोस्ट असली तरी ती खरी आहेच असे नाही.
3. लिंक, व्हॉटस्अप नंबर, यूपीआय आयडी हे आधी गुगलवर तपासा.
4. सरळ संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बघा.
5. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधा.