

हल्लीच्या काळात विवाहाच्या नावाखाली विश्वासघात करून फसवणूक होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. त्यात सर्वाधिक फसवणुकीचे प्रकार घडतात ते विवाह जुळवणार्या मॅट्रिमोनियल साईटस्च्या माध्यमातून. अशा घटना टाळण्यासाठी मॅट्रिमोनियल साईटस्वर कडक बंधने घालण्यात आली आहेत. मात्र, या साईटस् ही बंधने व नियम धाब्यावर बसवतात आणि आपले अधिकाधिक यूझर्स कसे वाढतील याकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे काही भामट्यांना फसवणुकीसाठी मॅट्रिमोनियल साईटस् म्हणजे मोकळे रान झाले आहे...
ठाणे जिल्ह्यातील डायघर परिसरातील खर्डी गावात राहणार्या 33 वर्षीय नोकरदार महिलेने विवाह जुळवणार्या एका मराठी मॅट्रिमोनियल वेबसाईटवर काही महिन्यांपूर्वी नोंदणी केली होती. नोंदणी केल्यानंतर काही वेळातच या महिलेस अमित दिवेकर नामक व्यक्तीने या साईटवर संपर्क केला. आपण लंडनमध्ये सिव्हिल इंजिनिअर असल्याचे त्याने या महिलेस सांगितले. हळूहळू या व्यक्तीने महिलेशी फोनवरून संपर्क वाढवला. आपण गर्भश्रीमंत असल्याचे भासवले व मला भारतात येऊन तुझ्याशी लग्न करायचे आहे, अशी बतावणी महिलेस केली. त्यानंतर फोनवरून सतत बोलणे करून या तथाकथित एनआरआय नागरिकाने महिलेस भावी आयुष्याची अनेक सप्तरंगी स्वप्ने दाखवली.
याच दरम्यान एकेदिवशी त्याने फोनवरून आपण एक महागड्या वस्तूची बॅग तुमच्या पत्त्यावर कुरिअर करीत आहे, असे तिला सांगितले. दुसर्याच दिवशी एका अनोळखी व्यक्तीने महिलेस फोनवरून तुमचे पार्सल दिल्ली विमानतळावर आले असल्याचे सांगितले. परंतु, हे पार्सल नियमबाह्य असून, त्यात अत्यंत मौल्यवान वस्तू असल्याने ते सोडवण्यासाठी तुम्हाला काही दंड भरावा लागेल, अशी बतावणी केली. त्यानंतर महिलेस विविध करणे सांगून 4 लाख 57 हजार रुपये एका बँक खात्यात जमा करायला भाग पाडण्यात आले. त्यानंतर मात्र तथाकथित विदेशी नागरिकाने आपला मोबाईल बंद केला. वारंवार संपर्क करूनदेखील त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने याप्रकरणी डायघर पोलिसांत तक्रार दाखल केली.
अशाच स्वरूपाची घटना कापूरबावडी पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी उघड केली होती. विवाह जुळवणार्या मॅट्रिमोनियल साईटवर प्रोफाईल बनवून विधवा व घटस्फोटित महिलांना हेरून त्यांचे आर्थिक व लैंगिक शोषण करणार्या प्रजित जोगीश केजे ऊर्फ प्रजित तयल खलीद ऊर्फ प्रजित टिके या 44 वर्षीय भामट्यास पोलिसांनी गजाआड केले होते. कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ढोकाळी येथे राहणार्या एका महिलेने विवाह जुळवणार्या वेबसाईटवर नोंदणी केली होती. याच वेबसाईटच्या माध्यमातून प्रजित टिके नामक एका व्यक्तीने या महिलेशी विवाह करण्याची तयारी दर्शवली. आपण गर्भश्रीमंत असून, पॅरिस येथे स्वतःचे फाईव्ह स्टार हॉटेल असल्याची बतावणी या व्यक्तीने महिलेस केली. चांगले स्थळ असल्याची समजूत झाल्याने या महिलेने त्या व्यक्तीसोबत ओळख वाढवली.
याच दरम्यान, त्याने ठाणे गाठून महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली. तसेच माझे पॅरिस येथील हॉटेल मी विक्री केले असून, त्याची मोठी रक्कम आरबीआयमध्ये अडकली आहे. ही रक्कम परत मिळवण्यासाठी मला पैशांची अत्यंत गरज आहे, माझी रक्कम मिळाली की, मी तुम्हाला दुप्पट पैसे देईन, अशी बतावणीदेखील या भामट्याने केली. त्यानंतर या ठगाने महिलेकडून तब्बल 16 लाख 86 हजार रुपये इतकी रक्कम उकळली. मात्र, त्यानंतर या भामट्याने तक्रारदार महिलेशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने कापूरबावडी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या घटनेचा तपास तत्कालीन महिला पोलिस निरीक्षक प्रियतमा मुठे यांच्याकडे सोपविण्यात आला. मुठे व त्यांच्या पथकाने आरोपीची माहिती मिळवली असता तो परराज्यात राहून सतत आपले स्थान बदलत असल्याचे समोर आले. तसेच तो अनेक महिलांचे डेबिट व क्रेडिट कार्ड वापरून अत्यंत महागड्या वस्तू खरेदी करीत असल्याचेदेखील स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर करडी नजर ठेवून त्याच्या लोकेशनवर लक्ष ठेवले. याच दरम्यान हा भामटा ठाण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर पोलिसांनी त्यास ठाण्यातील एका लॉजमधून अटक केली. पुढील चौकशीतून मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून महिलांशी संपर्क करून या भामट्याने तब्बल 26 महिलांची 2 कोटी 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते.
अशा अनेक घटना मागील काही वर्षांत समोर आल्या आहेत. मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून फक्त महिलांचीच फसवणूक होते असे नाही, तर पुरुषांचीदेखील फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. लग्न इच्छुक श्रीमंत पुरुषांना लग्नाचे आमिष दाखवून लुबाडणार्या महिला ठगांच्या एका टोळीस मुंबई पोलिसांनी मागे गजाआड केले होते. मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांशी संपर्क करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या घटना कोरोना काळानंतर वाढल्या आहेत. या फसवणुकीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा म्हणून महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून मॅट्रिमोनियल साईटस् अर्थात लग्न जुळवणार्या वेबसाईटस्वर कडक बंधने घालण्यात आली आहेत.
फसवणुकीच्या आतापर्यंत जितक्याही घटना समोर आल्या आहेत, त्यात फक्त फसवणूक करणार्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतो. परंतु, अशाप्रकारे फसवणुकीचा बाजार मांडणार्या मॅट्रिमोनियल साईटस्वर मात्र आतापर्यंत एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कोणी कितीही फसवणूक केली, तरी आपल्यावर कारवाई होतच नाही याची जाणीव असल्यानेच हे साईटस् चालवणारे सारा बाजार बिनदिक्कत मांडून बसले आहेत. विवाह इच्छुक व्यक्तीची झालेली फसवणूक ही त्या मॅट्रिमोनियल साईटस्च्या माध्यमातून झालेली असते. म्हणून अशा घटनेत जोपर्यंत संबंधित पोर्टल्स व वेबसाईटस् व्यवस्थापनालादेखील सहआरोपी करण्यात येत नाही तोपर्यंत या फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसणे अशक्य आहे, असे मत सायबर कायदातज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी व्यक्त केले.
या साईटस् आयटी अॅक्ट-2 अंतर्गत कायद्याच्या चौकटीत येतात. तसेच या साईटसाठी काही बंधने घालून देण्यात आली आहेत. त्यात सर्व्हिस प्रोव्हायडरला ही मॅट्रिमोनियल साईट आहे, डेटिंग साईट नाही हे जाहीर करावे लागते. मॅट्रिमोनियल साईटवर येणार्या यूझर्सचे कन्फर्मेशन बंधनकारक आहे. यूझर्सने दिलेल्या माहितीची पुष्टी करणे तथा खासगी माहितीची सुरक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. यूझर्सची कोणतीही खासगी माहिती सार्वजनिक होणार नाही, याची काळजी वेबसाईटना घ्यावी लागते. तसेच उपयोगकर्त्यांना गैरवापराबद्दल सूचना देणे आणि यासंबंधी माहिती साईटवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर यूझर्सला फ्रॉडबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करणेही बांधनकारक असून, वेबसाईटवर तक्रारीसाठी नियुक्त ऑफिसरशी निगडित माहिती उदा., त्यांचा संपर्क क्रमांक देणे गरजेचे आहे. मात्र, मॅट्रिमोनियल साईटस् सर्व बंधने व नियम धाब्यावर बसवतात.