

जायखेडा (नाशिक) : दरेगाव येथील खून प्रकरणाचा तपास करण्यात जायखेडा पोलिसांना यश आले असून, चारित्र्यावर संशय घेत होणाऱ्या सततच्या मारहाणीला कंटाळून पत्नीनेच पतीचा खून केल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या सहा तासांत संशयित पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.
दरेगाव येथील आदिवासी वस्तीवर राहणारे कैलास जिभाऊ पवार (45) यांचा मृतदेह घराजवळील नाल्यात आढळून आला होता. याबाबत पोलिसपाटील यांनी जायखेडा पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सागर काळे यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी भेट देत पंचनामा केला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने जायखेडा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मृत पवार यांच्या पत्नीची चौकशी केली असता चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून सतत होणार्या मारहाणीस वैतागून पत्नी मनीषा पवार हिनेच दोरीच्या साहाय्याने पतीचा गळा आवळून खून केल्याचे तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत फेकून दिल्याचे समोर आले. या प्रकरणी पंढरीनाथ भैया सोनवणे यांच्या फिर्यादीवरून मनीषा पवारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, तिला अटक करण्यात आली आहे. या तपासासाठी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गनापुरे, पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप चेडे, हवालदार रामराव शेरे यांच्या पथकाने तपास केला.
फोटो : कैलास पवार (मालेगाव बातमी)
-------०--------