[author title="डॉ. प्रदीप पाटील ( काऊंसेलर आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट )" image="http://"][/author]
उद्यापासून दारू सोडतो मी.. असे आम्हाला रोज सांगतो, आणि गेली वीस वर्षे दारू पितोय! दारू पिणार्याची बायको मला सांगत होती. बायकोने 'नियम' करून दिलेला होता की दारू प्यायची नाही, नाहीतर मी तुला सोडून जाईन. मी आता यापुढे तुझ्याशी नीटच बोलेन. मी तुला शिवी देणार नाही, असे तो मला नेहमी सांगतो. पण, चिडला की शिव्या देऊनच बोलत असतो! एक बायको मला सांगत होती. मी त्याला हजारवेळा सांगितलं. पण, तो काही मी सांगितलेले ऐकायला तयार नाही.
येताना रोज भाजी घेऊन येत जा, असे मी कितीतरी वेळा सांगितले, पण हा विसरूनच येतो आणि मला जाऊन भाजी घेऊन यावी लागते. या प्रकारच्या साध्या साध्या गोष्टी न पाळण्यापासून ते अनेक गंभीर गोष्टी न पाळण्यापर्यंतच्या.. म्हणजे, हा आपल्या पूर्वीच्या गर्लफ्रेंडबरोबर अजूनही बोलत असतो. तेही तासन्तास! हे सर्व नात्यांमध्ये एक प्रकारे गंभीर तणाव निर्माण करतात आणि याचे कारण असते. ठरलेले नियम मोडणे.
लग्न झाल्यानंतर बर्याच वेळा सुरुवातीला अनेक नियम इमाने इतबारे पाळले जातात. पण, नंतर नात्यांमध्ये जे नियम अत्यावश्यक असतात ते तोडले जातात आणि त्यातून एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण होऊ लागतो. नात्यातले नियम हे काही वेळा स्पष्टपणे बोलून दाखवले जातात व ते जगजाहीर असतात. उदाहरणार्थ – व्यसनीपणा पूर्णपणे सोडून देणे. तर काहीवेळा अपेक्षा ठेवून मनातल्या मनात गृहीत धरले जातात. उदाहरणार्थ- आपल्या पूर्वीच्या कोणत्याही रोमँटिक नात्याला सोडचिठ्ठी देणे किंवा जोडीदाराशी प्रामाणिक राहणे. जेव्हा हे नियम मोडले जातात तेव्हा आपला विश्वासघात झालेला आहे अशी घट्ट समजूत जोडीदाराची होऊ लागते. त्यातून नात्याला तडे जाऊ लागतात आणि नाते संपते किंवा एखादा गुन्हा होऊन दोघांपैकी एक तुरुंगात जातो.
नात्यांमध्ये जो फसवतो तो बर्याच वेळा नातं टिकावं म्हणून अनेक प्रॉमिसेस करतो. वचनं घेतो आणि देतो. काहीजण अशावेळी आपल्या जोडीदाराला माफ करतात किंवा समजून घेतात. पण, वारंवार तसे घडू लागले तर मात्र त्यांना वाटू लागते की आपला विश्वासघात झाला आहे. अशी समजूत झालेला जोडीदार त्यावर विश्वास ठेवत नाही. त्यातून विश्वासघात झालेला जोडीदार हा डिप्रेशन या रोगाने पछाडला जाऊ शकतो आणि काही वेळा आत्महत्या ही करू शकतो. सर्वसाधारणपणे कोणत्या ही नात्यांमध्ये आपण काय व कोणत्या गोष्टी पाळायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या हे दोघेही मिळून ठरवत असतात. पण, जेव्हा ते पाळले जात नाही तेव्हा वारंवार त्याकडे दुर्लक्ष करत राहिले, तर मात्र कधीतरी त्याचा स्फोट होतो आणि नात्यावर परिणाम होऊ लागतो.
मग दुसरी पायरी सुरू होते ती म्हणजे ज्या जोडीदारावर अन्याय होतो त्या जोडीदारालाच किंमत न देणे, त्याच्याविषयी वाईट साईट बोलणे, तोच कसा चुकीचा आहे सांगत राहणे, असे प्रकार सुरू होतात. त्यातून मानसिक स्वास्थ्य बिघडत जाते आणि तिसरी पायरी म्हणजे सरळ सरळ आपल्या जोडीदाराला धोका दिला जातो. याचे मोठे उदाहरण म्हणजे बेवफाई. आज जवळपास सर्वत्र, सर्व समाजात खालील गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.. जोडीदार सोडून इतर व्यक्तीशी प्रणय गप्पा करणे, लैंगिक संबंध ठेवणे. जोडीदाराला अंधारात ठेवणे. जोडीदाराच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण करणे. भावनिक पातळीवर दुसर्यामध्ये गुंतणे. कोणत्याही नात्यांमध्ये जेव्हा नियम तोडले जातात तेव्हा ते कोणते असतात?
अतिशय वाईट पद्धतीने जोडीदाराशी बोलणे किंवा वागणे. जोडीदाराविषयी संवेदनशील नसणे. त्याचा सतत अपमान करणे. त्याच्याशी हुज्जत घालणे. त्याच्याशी बनवाबनवी करणे, भावनिक किंवा शारीरिक पातळीवर विवाहबाह्य संबंध ठेवणे. विवाहबाह्य संबंध हे उघड उघड ठेवणे किंवा लपवून ठेवणे, सतत खोटे बोलणे, शारीरिक किंवा शाब्दिक मारहाण करणे, कोणत्याही नात्यातील उघड पाळायचे नियम असोत किंवा अपेक्षा ठेवलेले नियम असोत, नियम तोडण्यापूर्वी जोडीदाराला ते आपण का तोडतो आहोत व त्या तोडण्याचे परिणाम आपण भोगायला तयार आहोत हे सांगणे अत्यावश्यक असते. असे जेव्हा केले जाते तेव्हा त्या नात्यांमध्ये हिंसाचार होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात कमी होते.
त्याचबरोबर जोडीदारांना नात्यात राहायचे की नात्यातून बाहेर पडायचे हा निर्णय लगेच घेऊन स्वतःचे आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायचे स्वातंत्र्य व अवकाश मिळतो. जेव्हा नियम पाळता येत नसतील तेव्हा ते नियम का पाळता येत नाहीत, या मागची कारणे काऊंसेलरकडे जाऊन, शोधून घेऊन त्यावर उपाययोजना करता येते. एवढेच नव्हे तर जोडीदार नियम मोडणे थांबविण्यास तयार नसेल तर त्याचे पुढचे दुष्परिणाम जे घातक आणि हिंसक असतात ते काऊंसेलरकडून तपासून घेऊन शहाणपणाचे निर्णय घेता येऊ शकतात. सर्वसाधारणपणे असे समाजात घडत नाही आणि जोडीदार स्वतःच्याच मनाप्रमाणे निर्णय घेऊ लागतात आणि खून, हाणामार्या किंवा फसवणुकीस बळी पडतात!!
हेही वाचा