

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बेताज बादशहा वाल्मीक कराड आणि त्याची पिलावळ सध्या गजाआड झालेली आहे. कायद्यानं पुढं त्यांचं काय व्हायचं ते होईल; पण हा प्रश्न एकट्या बीडपुरताच मर्यादित नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि कानाकोपर्यात असे शेकडो ‘वाल्मीक’ आपापल्या ‘वारुळात’ बसून आपल्या पिलावळीच्या साथीनं गुन्हेगारीचे रोज नवे फुत्कार सोडत आहेत. राज्यभरातील या झाडून सगळ्या वाल्मीकींचा फणा ज्या दिवशी ठेचला जाईल, तो खरा सुदिन...
1986 साली दाऊद इब्राहिम भारतातून दुबईला आणि तिथून पाकिस्तानात पळून गेला. त्यानंतर 12 मार्च 1993 रोजी त्याने पाकिस्तानात बसून मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले; पण तो पाकिस्तानात पळून गेला म्हणून मुंबईच्या गुन्हेगारी जगतावरील त्याचे वर्चस्व संपले आहे काय, तर नाही. आजही मुंबईतील शेकडो गुन्हेगारी कारवाया दाऊदच्या आणि त्याच्या पिलावळीच्याच नावे चालतात. बॉलीवूडमधील कोण कोण तारे-तारका दाऊदच्या तालावर नाचतात, मुंबईत अजून दाऊदचे कोण कोण डावे-उजवे हात आहेत, त्यांचे काय ‘उद्योग’ आहेत, याचा सगळा कच्चा-चिठ्ठा मुंबई पोलिसांकडे आहे; पण तिकडे का कानाडोळा केला जात आहे, हे जनताही जाणते. दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बसलेला छोटा राजन आणि नागपूरच्या कारागृहात बसलेला अरुण गवळी ऊर्फ डॅडी हे आजकाल ‘वाल्मीकी’ झाले आहेत, असे कोण छातीठोकपणे सांगू शकतो काय?
वसई, विरार आणि उल्हासनगर भागात धुमाकूळ घालणारे ठाकूर आणि कलानीसह त्यांची पिलावळ आजकाल काय साधुसंन्यासी बनली आहे काय, तर नाही. आजही या मंडळींचे जुने धंदे चालूच आहेत; शिवाय काही नवे जोडधंदेही या लोकांनी आजकाल चालू केल्याचे दिसतात. चाळीस वर्षांत या पिलावळीचा बीमोड का होत नाही? आजही या मंडळींना कोण आणि का पोसतंय, ही उभ्या महाराष्ट्रातील जनता जाणते. त्यामुळे एक वाल्मीक कराड गजाआड गेला म्हणून धन्यता मानण्यात तसा काही अर्थ नाही.
गेल्या पंचवीस वर्षांत पुणे शहरानं फार वेगानं कात टाकून प्रगतीच्या दिशेनं झेप घेतली; पण त्याच्यापेक्षा जास्त वेगानं या भागातील गुन्हेगारी फोफावली. पुणे भागात जसजसे जमिनींचे भाव गगनाला भिडत गेले, तस तसे या भागात रोज नवे लँड माफिया उदयाला येत गेले. या लँड माफियांनी गोरगरिबांच्या जमिनी त्यांच्या मुंड्या मुरगाळून ताब्यात घेतल्याच; पण खंडणीसाठी पुण्यातील आयटी कंपन्या, बडे बिल्डर, उद्योगपती, व्यावसायिक यांना वेठीस धरलेले दिसते आहे. आजकाल तर पुण्यात मुंबईपेक्षा जादा गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत. कोणत्या टोळीचा कोण ‘आका’ आहे, याची खडा न् खडा माहिती जशी जनतेला आहे, तशी पोलिसांनाही आहे; पण तरीही या टोळ्यांच्या गुन्हेगारी कारवाया खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे एक गज्या मारणे गजाआड गेला म्हणून कुणी कुणाची पाठ थोपटायचे कारण नाही.
कोल्हापूरची गुन्हेगारी थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणजे अर्थकारण आणि गुन्हेगारी इथं हातात हात घालून चालते. त्यातूनच गेल्या काही वर्षांत कोल्हापुरात खासगी सावकारी, जुगार, अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी यांची हातमिळवणी झाल्याचे दिसते. इथली सावकारी तर इतकी अफाट आहे की, बहुतांश गावांमध्ये सावकारांचा राबता पाहायला मिळतो. या सावकारी आणि अवैध धंद्यावरील वर्चस्वातून वर्षाकाठी इथे डझनावारी मुडदे पडतात. हे कोण मुडदेफरास आहेत आणि त्यांचे पोशिंदे कोण आहेत, याचा सगळा सात-बारा जसा जनतेकडे आहे, तसाच तो इथल्या पोलिसांकडेही आहे; पण या गुन्हेगारीला ‘अर्थकारणाची जोड’ असल्यामुळे इथले वाल्मीकी फोफावतच चालले आहेत. त्यामुळे एक सम्राट कोराने गजाआड गेला म्हणून कुणी कुणाला शाबासकी देण्याची आवश्यकताच नाही.
चंदन तस्करीचा बेताज बादशहा वीरप्पन जिवंत होता, तेव्हापासून सांगली-मिरज परिसरात त्याचे ‘भाऊबंद’ आपल्या कामाचा ‘चंदनी दरवळ’ पसरविण्याचे काम करीत होते. वीरप्पन मेला म्हणून इथली त्याची पिलावळ मेली नाही. आजही त्यांची कामगिरी ‘झुकेगा नहीं साला’ अशा गुर्मीत सुरूच आहे. चंदनाच्या जोडीला या पिलावळीने आता गांजाची धुरी दिलेली दिसत आहे. देशातील अनेक भागात आजही इथून चंदन आणि गांजाची तस्करी चालते. कोण आहेत हे ‘वीरप्पनचे भाऊबंद’ आणि कोण आहेत त्यांचे ‘आका’ हे अवघी जनता जाणते आणि पोलिसही जाणतात.
अलीकडे तर सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी चक्क ड्रग्जचे कारखानेच धडधडून सुरू असलेले दिसले. कुठल्या ‘आका’च्या आशीर्वादाने हा ‘डर्टी ड्रग्ज’चा उद्योग चालतो हे मुंबई-पुण्याच्या पोलिसांना कळतं; पण इथल्या पोलिसांना कळत नाही, यातच सगळे इंगित सामावलेले आहे. त्यामुळं गांजाच्या चार पुड्या कुणाकडं सापडल्या म्हणून पोलिसांनी कुणाला पकडलं तर इथल्या पोलिसांचा फार गवगवा करण्यालाही तसा काही अर्थ नाही. कारण, इथले खरे ‘आका’ तर अजून मोकाटच आहेत.
वानगीदाखल ही काही उदाहरणं दिली आहेत; पण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात थोड्या-फार फरकाने ही अशीच स्थिती आहे. कोण मुंबई अंडरवर्ल्डशी इमान राखून आहे, कोण आपापल्या भागातील गोरगरिबांच्या मुंड्या मुरगाळण्यात माहीर आहे, कोण भूखंड माफिया बनून सर्वसामान्यांच्या जमिनी हडप करीत सुटला आहे, कोण नदीत शिरून वाळूच लंपास करताना दिसतात, कोण पठाणांच्या पलीकडचे सावकार बनले आहेत, कोण आधुनिक ‘रतन खत्री’चा अवतार बनून वावरताना दिसतात, कुणाला बनावट दारूचा स्वाद आवडतो, कुणाला तर खून-हाणामार्यांची सुपारी घेण्याचा छंद जडला आहे. गुन्हेगारीची जेवढी म्हणून रूपे आहेत, त्या सगळ्या चेहर्यांचे ‘वाल्मीक’ इथं उंडारताना दिसताहेत. ज्या दिवशी या सगळ्या वाल्मीकींचा चोख बंदोबस्त होईल, तोच खरा सुदिन!
महाराष्ट्रातील ज्या ज्या भागात जे जे कुणी वाल्मीक सध्या तांडव घालत आहेत, त्यापैकी बहुतांश जणांना कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याचा राजाश्रय लाभलेला दिसतो आहे. याबाबतीत कोणताच राजकीय पक्ष शुचिर्भूत असलेला दिसत नाही. या राजाश्रयाच्या जोरावरच या मंडळींचं तांडव सुरू असलेलं दिसतं.