Sindhudurg Crime | अनैतिक संबंधाचा बळी!

हसत्या-खेळत्या कुटुंबाला लागली उतरती कळा
Sindhudurg Kudal murder news
अनैतिक संबंधाचा बळी! file photo
Published on
Updated on

प्रमोद म्हाडगुत, सिंधुदुर्ग

मूळ कर्नाटक-विजापूर येथील शिवा नायक कुटुंब रोजगारासाठी सिंधुदुर्ग -कुडाळ मध्ये स्थायिक झाले. शिवाने भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. तो अल्पावधीतच भाजी विक्रेता म्हणून नावारूपास आला. आर्थिक परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर त्याने लग्न केले. लग्नानंतर तीन मुलं होऊन त्यांचा सुखी संसार चालू होता. पण, शिवाची पत्नी सुनंदा हिचे लगतच असलेल्या सीताराम राठोड नामक युवकाशी सुत जुळलं आणि इथेच त्यांच्या हसत्या-खेळत्या कुटुंबाला उतरती कळा लागली.

प्रियकर सीताराम राठोड याच्या प्रेमात सुनंदा इतकी बुडाली की, तिने सीतारामशी संगनमत करून दि.26 डिसेंबरच्या रात्री 2.30 वाजता पती शिवाला या जगातून संपवून टाकले. तिने शिवाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा बनाव केला. पण, हा बनाव कुडाळ पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांतच सुनंदाला पोलिसांनी अटक केली. घटनेच्या 21 दिवसांनंतर फरार सुनंदाचा प्रियकर व त्यांचे दोन भाचे यांना पोलिसांनी अटक केली. शिवा नायक एक चांगला युवक पत्नीच्या अनैतिक संबंधाचा बळी ठरल्याने त्यांच्या तिन्ही मुलांचं बापाचं छत्र हरपून गेलं.

सन 2024 सालाचे शेवटचे दिवस होते. कुडाळ शहरामध्ये सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध संस्था नियोजनात व्यस्त होत्या. दि.25 डिसेंबरच्या मध्य रात्री अचानक कुडाळ पोलिस स्टेशनमध्ये फोन आला की, एक भाजी विक्रेता शिवा नायक याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची टीम घटनास्थळी पोहोचली. यावेळी खोलीच्या बेडरूममध्ये साडी लोंबकळत होती आणि बाहेर शिवाचा मृतदेह निपचित पडला होता. सोबतच पत्नी दु:खी चेहर्‍याचा भाव आणून रडत बसली होती. बाजूला तिची दोन तान्हुली मुलं होती. यावेळी सुनंदाने या घटनेची माहिती आपल्या नणंदेला (शिवाची बहीण) दिली होती. पोलिसांनी माहिती विचारताच शिवा बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत होता, हे मला दिसल्यावर मी एकटीनेच त्याला खाली उतरवून ठेवले, असं सुनंदाने पोलिसांना सांगितलं. एकटी महिला एवढ्या मोठ्या पुरुषाला तेही गळफास अवस्थेत असलेल्याला कशी काय खाली उतरवेल, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आणि तिथंच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण, परिस्थितीचा विचार करून कुडाळ पोलिसांनी सुनंदाच्या सांगण्यावरून आत्महत्येची घटना रेकॉर्डवर घेऊन शिवाचा मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर नातेवाइकांनी शिवाचा मृतदेह कर्नाटक -विजापूर येथील गावी अंत्यविधीसाठी नेला. शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला. घरचा तरणा, कर्ता पुरुष गेल्याने आई शांताबाई, भाऊ अशोक टाहो फोडून रडत होते. अत्यविधीला सर्व नातेवाईक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवाच्या पत्नीला मारण्यात ज्याचा सहभाग होता ते संशयित सुद्धा अंत्यविधीला उपस्थित होते.

अत्यविधीनंतर शिवाचा भाऊ अशोक नायक याने आपल्या भावाचा घातपात झाला, असे लेखी निवेदन तपासी पोलिस अधिकारी सचिन गवस यांच्याकडे दिले होते. त्यामुळे पोलिसांच्या संशयाला अधिकच बळ मिळाले आणि पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तपासात स्वतः जातीनिशी लक्ष घालून शिवाच्या पत्नीला ताब्यात घेण्यासाठी शिवाच्या मूळ गावी कर्नाटक मधील विजापूर येथे आपलं पथक पाठवून दिले. सुनंदाला ताब्यात घेतले. यावेळी नातेवाइकांनी पोलिसांना सुनंदाला ताब्यात घेण्यास विरोध केला. पण, विजापूर पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेऊन कुडाळ पोलिस स्थानकात आणले. पोलिसी खाक्या दाखवताच सुनंदा पोपटासारखे बोलू लागली. आपल्या अनैतिक संबंधात अडचण होत असल्याने पती शिवाचा खून केल्याची कबुली सुनंदाने पोलिसांना दिली. त्यानंतर तिच्यावर दि.13 जानेवारीला गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला दोन दिवस पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली.

कुडाळ पोलिसांनी मग दुसरा संशयित सीताराम राठोड याचा माग काढला; पण सीताराम आपल्या दोन सहकार्‍यांसह (आदिक चव्हाण व अजित चव्हाण) फरार होता. ते दोन सहकारी सीताराम राठोड यांचेच भाचे होते. त्यातील आदिक चव्हाण हा नुकताच गावावरून (विजापूर-काळगितांडा) कुडाळ मध्ये आला होता. संशयितांनी आपले मोबाईल बंद ठेवल्याने पोलिसांच्या तपासाला मर्यादा पडत होत्या. इकडे सुनंदाची पोलिस कोठडीची शिक्षा संपल्याने कुडाळ पोलिसांनी परत पोलिस कोठडी मिळावी, या अटीवर न्यायालयीन कोठडी मागितली. ती न्यायालयाने मान्य केली आणि सुनंदाला सावंतवाडी कारागृहात पाठविण्यात आले. संशयित कुडाळमध्ये येण्यासाठी निघाले. याची कुणकुण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आणि 16 जानेवारीला कुडाळ पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर कुडाळ पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयित सीताराम राठोड, अजित चव्हाण व आदिक चव्हाण यांच्यासह न्यायालयीन कोठडीत असलेल्या पत्नी सुनंदा नायक हिला न्यायालयाने पोलिस कोठडी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news