

सांगली जिल्ह्यातील वारणा-कृष्णा काठावरील गावांमध्ये जशी समृद्धी आलेली आहे, त्याच प्रमाणात या भागात अंधश्रद्धाही मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या दिसतात. स्वतःला 'अंबरनाथ' म्हणवून घेणाऱ्या अशाच एका भोंदूबुवाने भल्याभल्यांना आपल्या जाळ्यात ओढून कसा गंडा घातला होता, त्याची ही कर्मकहाणी...
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात वारणा नदीकाठी एक टूमदार गाव आहे. क्रांतिकारकांचे गाव म्हणून या गावाचा चांगलाच लौकीक आहे, गावाचा राजकीय दबदबाही मोठा. त्यामुळे गावाला एकदा आमदारकीही मिळाली होती.
शिवाय, गावातील किमान आठ-दहाजण तरी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील वेगवेगळ्या साखर कारखान्यांत, दूध संघांत, बँकांमध्ये संचालक म्हणून हमखास मिरवत असायचे. यावरून दोन जिल्ह्यांत या गावाचा काय दबदबा असेल, याचा अंदाज येण्यास हरकत नाही. अशा या गावात 'रघुनाथ' नावाचा एक ठार अंगठेबहाद्दर इसम रहायचा, पाटलांच्या भावकीतील असल्याने गडी नेहमी रूबाबात असायचा, जोडीला वारणाकाठी चार-पाच एकर योतीही होती; पण तो अविवाहित होता. तो स्वतःला बालब्रह्मचारी समजायचा.
शिवाय, आपण नाथपंथाची दीक्षा घेतली असून, आपलं नाव 'अंबरनाथ' असल्याचेही सांगायचाः पण गाव मुळातच सुधारणावादी आणि पुरोगामी विचारांचे असल्याने या अंबरनाथाला गावातलं कुत्रंसुद्धा विचारत नव्हतं. कारण, हा दोन-दोन महिने अंघोळच करायचा नाही, जवळून गेला तरी बोकडासारखा घणायचा, म्हणून गावातील लोकं याच्यापासून फटकूनच असायची. हा अंबरनाथही नेहमी स्वतःच्याच विश्वात रमलेला दिसायचा. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर मात्र या बहाद्दराने आपल्या 'लीला' दाखवायला सुरुवात केली. गावात कोण विचारत नाही म्हटल्यावर याने गावापासून सात-आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका नगरपालिकेच्या 'सव्वालाखी' गावात आपला 'दरबार' भरवायला सुरुवात केली. एका डॉक्टराच्या ओसाड पडलेल्या बंगल्यात हा भोंदूबुवा दररोज सायंकाळी आपला दरबार भरवू लागला. हळूहळू आजुबाजूची आणि गावातील शे-दोनशे लोकं त्याच्या दरबारात हजेरी लावू लागली. हा अंबरनाथ या दरबारात मंत्राने अग्नी पेटवणे, हवेतून हात फिरवून अंगारा-धुपारा काढणे, लोकांच्या मनातील इच्छा ओळखणे, लोकांच्या समस्यांवर तोडगा सांगणे असल्या भानगडी करीत असायचा; पण आपली सारासार विवेकबुद्धी गहाण ठेवलेल्या त्याच्या भक्तांना अंबरनाथाची ही 'हातचलाखी' लक्षातच यायची नाही.
कोण होते त्याच्या भक्तगणांमध्ये... भोळीभाबडी माणसं, आया-बाया, तरणीताठी पोरं-पोरी तर होत्याच; पण डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक, बडे-बडे व्यावसायिक, काही सेवानिवृत्त सैनिक अधिकारी अशी बरीच मंडळी त्याच्या भक्तगणात सामील झाली होती. काही विज्ञानाचे शिक्षक-प्राध्यापकही त्यात होते; पण आपली सगळी विज्ञानवादी शिकवण बासनात गुंडाळून ठेवलेल्या या मंडळींच्या लक्षात ही वैज्ञानिक हातचलाखी येत नव्हती. कारण, शेवटी विषय होता 'अंधभक्तीचा'! या अंबरनाथाने 'अंबरनाथ लिलामृत' नावाचा एक ग्रंथही लिहून तो स्वतःच्या नावासह छापून घेतला होता.
अर्थात, या अंबरनाथ लिलामृत ग्रंथात होतं काय, तर संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील शेकडो ओव्या, संत तुकोबांच्या गाथेतील अनेक अभंग, स्वामींच्या दासबोधातील अनेक रामदास अभंग, यासह इतर अनेक संतांच्या अभंग आणि ओव्या या अंबरनाथ लिलामृत ग्रंथात जशाच्या तशा होत्या. म्हणजे आपल्या महान संतांचे अभंग आणि ओव्या या भामट्याने स्वरचित म्हणून या ग्रंथात समाविष्ट केल्या होत्या. त्याच्या स्वतःची एक ओवी, एक अभंग, इतकेच काय पण एक ओळही त्या ग्रंथात नव्हती.
सगळ्या संत साहित्याचे चौर्यकर्म करून या अंबरनाथाने ते सगळे साहित्य स्वरचित म्हणून अंधभक्तांच्या माथी मारले होते. अंबरनाथाच्या भक्तगणांमध्ये अनेक उच्चविद्याविभूषित मंडळी असताना एकाच्याही लक्षात अंबरनाथाचे हे चौर्यकर्म येऊ शकले नव्हते. यावरून या भक्तगणांचा किती अभ्यास असेल, त्याचा प्रत्यय येण्यास हरकत नाही.
अंबरनाथाच्या नादाला लागून मेंदूची माती करून घेतलेली ही भक्तगण मेंढरं रोज सायंकाळी या ग्रंथाचे पारायण करायचे. या पारायणाच्या वेळी हा भोंदूबुवा अंबरनाथही हजर असायचा. शेवटी सगळेजण आपलं मस्तक कसलं मॅच या भामट्याच्या पायी वाहून आपापल्या घरी परतायचे, असा नित्यक्रम ठरला होता.
हळूहळू भक्तगण भोजनासाठी म्हणून या भोंदबुवाला आपापल्या घरी आमंत्रित करू लागले. एरव्ही जमेल तसे हाताने करून खाणाऱ्या या भामट्याची रोज-रोजच्या आमंत्रणामुळे चंगळ सुरू झाली. चांगलं चुंगलं मिष्टान्न खावून काही दिवसांतच गडी चांगलाच गुबगुबीत झाला. एका भक्ताच्या घरी भोजनासाठी गेला असता, अंबरनाथाची नजर या भक्ताच्या तरण्याताठ्या पोरीवर पडली आणि सुरू झालं एक भलं मोठं कांड..!