

नंदुरबार : माझ्या मुलासोबत लग्न करुन घे, तो तुला सुखी ठेवेल; असा तगादा लावून त्रास दिला जात असल्यामुळे त्रासलेल्या विवाहित तरुणीने सागाच्या झाडावर गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. विवाहितेच्या पतीने ही फिर्याद दिल्यानंतर जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवतीबाई राकेश पाडवी (वय- २१ रा.माकडकुंडचा पिंपरीपाडा ता. धडगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. 18 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान ही घटना धडगाव तालुक्यातील माडकुंडचा पिंपरीपाडा येथे घडली. बुधवार (दि. 8) रोजी सायंकाळी याविषयी राकेश किर्ता पाडवी (वय- २२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.
फिर्यादीत म्हटले आहे की, दावल्या रंगल्या पाडवी (रा. माकडकुंड चा पिंपरीपाडा ता. धडगाव जि. नंदुरबार) याने मयत विवाहितेकडे तगादा लावला होता. "माझ्या मुलासोबत लग्न करुन घे, तो तुला सुखी ठेवेल. नवरा तर घरी राहत नाही" असे वळोवेळी सांगून तिला मानसिक त्रास दिला. तसेच तिचे सासु सासरे यांच्या समक्ष घरी येवून दोन तीन लाख रुपये देवुन टाकतो, तुमच्या सुनेचे लग्न माझ्या मुला सोबत करुन दया; असे सांगितले. त्याला त्रासून तिने जीवन यात्रा संपवली. म्हणून त्या विवाहितेला जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. धडगाव पो. ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल पाटील अधिक तपास करीत आहेत.