

डोंबिवली : कल्याण कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या मोहने-जेतवननगर परिसरात राहणार्या 45 वर्षीय रिक्षाचालकाला सावकाराकडून जाच केला जात असल्याने सातत्याने होणार्या जाचाला कंटाळून या रिक्षावाल्याने जीवनयात्रा संपवली.
मृत रिक्षावाल्याच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विजय मोरे असे जीवनयात्रा संपविलेल्या रिक्षावाल्याचे नाव असून तो कुटुंबीयांसह मोहने जेतवनगरमध्ये राहत होता. या प्रकरणी विजयचा भाऊ राजू जीवन मोरे याने तशी तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक विजय मोरे याने एका सावकाराकडून 20 ते 30 टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जावर मोठ्या प्रमाणावर व्याज आकारले जात असल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. मात्र सावकाराकडून रक्कमेसाठी तगादा लावला होता. व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी सावकार वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून विजयला त्रास देत होता.
वारंवार होणारा जाच असह्य झाल्याने विजय याने टोकाचा निर्णय घेतला. सोमवारी राहत्या घरातील छताला नायलॉनची दोरीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी गळफास सोडवून विजयला तात्काळ केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात हलविले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या घटनेला जबाबदार असणार्या सावकाराच्या विरोधात चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी मोरे कुटुंबीयांना दिले आहे. सावकाराच्या त्रासाला कंटाळून आपण जीवनयात्रा संपवली आहे. यात कुटुंबीयांना दोषी धरू नये. संबंधित सावकारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. विजय मोरे याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.
दोन दिवसांपूर्वीच कल्याणमधील एका खासगी सावकाराच्या साथीदारांनी आंबिवली भागातील एका व्यावसायिकाला आपल्या कार्यालयात आणून मारहाण केली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधितांनी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे सर्व खासगी सावकारांची चौकशी करून त्यांच्या कर्जवसुलीची माहिती आणि आढावा घेण्याचे आदेश खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी पोलिसांना दिले आहेत.