

नालासोपारा : एका नराधम बापाने आपल्या 3 मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
मुलीचा पिता खंडणी, गोळीबार तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. बुधवारी (दि.26) नालासोपारा पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीचा शोध नालासोपारा पोलीस घेत आहेत.
पीडित मुली या सख्ख्या बहिणी आहेत. त्या मूळच्या कोकणातील कणकवली येथे राहणार्या आहेत. मुलींचा 56 वर्षीय पिता कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला 5 मुली आहेत. कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करून बलात्कार करत होता. यापैकी एका मुलीचा 4 वेळा गर्भपातही करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अखेर पित्याच्या अत्याचारा कंटाळून आई पाचही मुलींना घेऊन नालासोपारा येथे एका नातेवाईकाच्या आश्रयाला आली. या 3 मुलींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची असून अन्य दोन मुली या अल्पवयीन आहेत.
वडिलांकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात तक्रार करण्याचा निर्णय त्यांनी हिंमतीने घेतला. मोठ्या मुलीने याबाबतची फिर्याद दिली आहे. आतापर्यंत वडिलांच्या दहशतीमुळे गप्प बसल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. मुलींच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपी फरार असून लवकरच त्याला अटक केली जाईल. ही घटना गंभीर असून आम्ही मुलींची फिर्याद मिळताच गुन्हा दाखल केला आहे. आता पर्यंतच्या तपासात 3 मुलींवर त्याने लैंगिक अत्याचार केला आहे.
विशाल वळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
आरोपी हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या, खंडणी, गोळीबार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2004 मध्ये एका व्यक्तीची आरोपीने हत्या केली होती, अशी माहिती नालासोपारा पोलिसांनी दिली. नात्याला काळीमा फासणार्या या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.