मिरा रोड : मिरा-भाईंदर शहरात एमएमआरडीए यांच्या कडील रेंटल हाऊसिंग योजनेअंतर्गत मिळालेल्या इमारती महापालिकेला देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित केल्या आहेत. या इमारतीमध्ये महापालिकेचे लाभार्थी यांना घरे देण्यात आली आहेत. त्यातच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या यातील लोढा येथील शासकीय इमारतीत तळमजल्यावर असलेल्या दुकानात बनावट विदेशी मद्य बनवणार्यावर राज्य उत्पादन शुल्क मुंबई यांचे भरारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मद्य बनवण्याचे साहित्य व मशीन जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. (Liquor management in public office)
मुंबई येथील माहिम सायन लिंक रोड या ठिकाणी विदेशी मद्याच्या बाटल्या घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मुंबई यांचे भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार 17 ऑक्टोबर रोजी सापळा रचून मोहम्मद नौशाद नसरूद्दीन आलम या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 5 बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार काशीमिरातील एमएम आरडीए महापालिकेच्या इमारतीमध्ये तळ मजला, दुकान गाळा नं. 11, या ठिकाणी छापा घालून बनावटरित्या बनवण्यात आलेल्या विदेशी मद्याच्या 2 बाटल्या, विदेशी मद्याच्या 3 बाटल्या तसेच बनावटरित्या विदेशी मद्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी आवश्यक सामग्री रिकाम्या बाटल्या, झाकणे, लेबल व इतर साहित्य असा 63 हजारचा मुद्देमाल जप्त केला.
एमएमआरडीएकडून महापालिकेला इमारती मिळाल्या आहेत. या महापालिकेच्या मालमत्ता बीएसयूपी योजनेतील रहिवाशी, विस्थापित, रस्ते बाधित नागरिकांना दिल्या आहेत. या खोल्या व दुकाने परस्पर भाड्याने देऊन त्यात बनावट मद्य बनविले जात होते. अशा अनेक खोल्यात बेकायदा व्यवसाय व दुकाने सुरू केलेले आहेत. महापालिकेच्या इमारतीमध्ये यापूर्वी पोलिसांनी पिटाचा गुन्हा दाखल केला होता. तर या लाभार्थ्यांना मिळालेल्या खोल्या या मोठया प्रमाणात भाड्यानेच दिलेल्या आहेत. त्यामुळे सुविधा आणि साफसफाई हे व्यवस्थित ठेवत नाहीत.