

भिवंडी (ठाणे) : भिवंडी शहरातील फेणे गाव या ठिकाणी हृदयद्रावक घटना घडली असून पती रात्रपाळी साठी कामावर गेलेला असताना घरात असलेल्या पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर उघडकीस आली आहे.
फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता वय ( 32 ) व मुली नंदिनी (वय 12), नेहा वय (वय 07) व अनु वय (वय 04) यांसोबत राहत होता. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो घरी परतला असता घरचा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा दरवाजा वाजवून ही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हतबल झालेल्या लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता आतमध्ये छताच्या लोखंडी अँगलवर गळफास घेऊन जीवनयात्रा संपविलेले मृतदेह आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी महिला अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले आहेत. घटनास्थळी जीवनयात्रा संपविण्यास कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिलेली चिट्ठी मिळाली आहे. नक्की विवाहीतेने मुलींसह जीवनयात्रा संपविण्यास कोणत्या कारणांमुळे टोकाचं पाऊल उचललं असावं याचे कारण अस्पष्ट असले तरी पोलिस अनेक बाजूने या प्रकरणाचा तपास करण्यात गुंतले आहेत.