

डोंबिवली : शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ असल्याने मुलीला शासकीय कोट्यातून एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून बदलापूर आणि उल्हासनगरमधील तिघा जणांनी मिळून डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात राहणाऱ्या एका रहिवाशाकडून 16 लाख 80 हजार रूपये उकळले. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून न देता पैसे तर उकळलेच शिवाय या मुलीचे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्षही वाया घालवले. हा सारा प्रकार सन 2021 ते 2022 या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी तथाकथित तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या विरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हे डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात राहतात. मुलगी डॉक्टर व्हावी असे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी मुलीला एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी वडील प्रयत्न करत होते. काही जणांशी ओळख झाल्यानंतर आम्ही शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ आहोत, असा मुलीच्या वडीलांसमोर देखावा उभा केला. त्यातील एकाने आपण केईएम रूग्णालयातील व्यवस्थापन समितीवर, तर दुसऱ्याने आपण नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात जबाबदार पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. सुरूवातीला त्यातील एकाने या प्रवेश प्रक्रियेसाठी 50 लाख रूपये लागतील असे तक्रारदाराला सांगितले. ही रक्कम तडजोडीनंतर 15 लाखांवर करण्यात आली.
शासकीय कोट्यातून आपली प्रवेश प्रक्रिया होणार आहे. दिलेले 15 लाख रूपये नंतर आपणास परत मिळतील, असा दिलासा देणाऱ्या तथाकथित उच्चपदस्थ अधिकाऱ्याने त्याचा बँक खात्याचा एक कोरा धनादेश तक्रारदाराला देऊन विश्वास संपादन केला. या बोलण्यावर विश्वास ठेऊन तक्रारदाराने टप्प्याने 16 लाख 80 हजार रूपये संबंधितांनी दिलेल्या बँक खात्यावर पाठविले.
पैसे भरणा केल्यावर तक्रारदाराने आपल्या मुलीची प्रवेश प्रक्रिया कधी होईल म्हणून तगादा लावला. आपल्या मुलीचा प्रवेश शासकीय महाविद्यालयात नक्की झाला आहे. प्रवेश उशिरा झाल्याने परीक्षा होऊन तिची गुणपत्रिकासुध्दा तयार आहे, अशी माहिती त्यातील एका कथित उच्चपदस्थाने तक्रारदाराला दिली. हे बोलणे ऐकून मुलीच्या वडिलांना आश्चर्य वाटले. त्यांनी अन्य दोघांशी संपर्क साधला असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली. तुमच्या मुलीची प्रवेश प्रक्रिया होणार नाही, त्यामुळे आम्हाला विचारू नका, अशी उत्तरे देऊन नंतर प्रतिसाद देणे बंद केले. हे ऐकून मुलीच्या पित्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी या प्रकरणातील प्रमुख इसमाशी संपर्क साधला. त्या इसमाने तुमचे पैसे परत करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यानेही संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. प्रवेशासाठी पैसे घेऊन ते परत न करता फसवणूक केल्याबद्दल, तसेच मुलीचे शैक्षणिक वर्ष फुकट घालविल्याबद्दल हतबल पित्याने मानपाडा पोलिस ठाणे गाठून कागदोपत्री पुराव्यांसह तिन्ही तथाकथित उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.