

डोंबिवली : सेवानिवृत्तांसाठी आमच्याकडे आकर्षक गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास बक्कळ लाभ होईल, असे एका भामट्याने दहा दिवसांपूर्वी डोंबिवली जवळच्या पलावा गृहसंकुलात राहणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तिला मोबाईलच्या माध्यमातून आमिष दाखविले. बोलण्यात गुंतवून कोड नंबर आणि बँक आर्थिक व्यवहाराची सगळी माहिती काढून घेऊन सेवानिवृत्ताची या बदमाशाने तब्बल 16 लाख 61 हजार रूपयांची फसवणूक केली. 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. या प्रकरणी फसगत झालेल्या सेवानिवृत्ताने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार सेवानिवृत्त हे पलावा टप्पा दोन वसाहतीमधील कासा विन्टो भागात राहतात. दहा दिवसांपूर्वी मोबाईलवर एका अनोळखी इसमाने संपर्क साधला. एक लिंक पाठवून त्यामध्ये सेवानिवृत्त व्यक्तिंसाठी आमच्याकडे आकर्षक गुंतवणूक योजना आहेत. आपण त्या योजनेचा लाभ घेतला तर आपणास अधिकचा परतावा मिळेल. याशिवाय आपण सेवानिवृत्त क्रेडिट कार्ड काढले तर दोन लाखांपासून ते दहा लाखांपर्यंत कोणत्याही क्षणी रक्कम वापरण्यास मिळणार आहे. या सगळ्या लाभांसाठी सेवानिवृत्त आमच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात, असे सदर इसमाने तक्रारदार सेवानिवृत्ताला सांगितले. त्याने संपर्क साधून प्रत्यक्ष गुंतवणूक योजनेची माहिती दिली. बोलत असतानाच अनोळखी व्यक्तिने सेवानिवृत्ताकडून त्यांच्या डेबिट कार्डचा नंबर, एटीएम कोड आणि ओटीपी नंबर मागवून घेतला. ही सर्व माहिती मिळताक्षणी बदमाशाने सेवानिवृत्ताच्या बँक खात्यामधील 16 लाख 61 हजार रूपयांची फसवणूक केली. अशाच पध्दतीने बदमाशाने अन्य तीन जणांची फसवणूक केली आहे.
गुंतवणूक करून घेतल्यानंतर बदमाशाने तक्रारदारांच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे खात्री पटल्यानंतर सेवानिवृत्ताने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी हे पुढील तपास करत आहेत.