

डोंबिवली : उत्तरप्रदेशातल्या जोनपूर येथील जमिनीचा वाद कल्याणमध्ये उफाळून आला. या वादातून कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकात असलेल्या इमारतीत घुसून एकाने आपल्या चुलत भावाला गोळ्या झाडून ढगात पाठवले. ही घटना बुधवारी (दि.19) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ तपासचक्रांना वेग देऊन गोळ्या झाडणार्याला जेरबंद करण्यात यश मिळविले.
रामसागर दुबे असे आरोपीचे नाव आहे. तर रंजीत दुबे असे गोळीबारात मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. मृत रंजीत दुबे एका टोळीचा सदस्य होता. त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई देखिल करण्यात आली होती. गोळीबार करणारा रामसागर हा उत्तरप्रदेशातील पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत रंजीत दुबे हा कुटुंबीयांसह कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकात एका इमारतीत राहत होता. तर त्याला ठार मारणारा अटक आरोपी रामसागर दुबे हा उत्तरप्रदेशातील जोनपूर येथील रहिवासी आहे. जोनपूर येथे रामसागर आणि रंजीत या दोघांची सामायिक जमीन आहे. या जमिनीवरून दोघांमध्ये गेल्या चार वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. गेल्या वर्षी या जमिनीवरून दोघांत जोरदार भांडण झाले होते. पोलिसांनी अटक केल्यानंतर दोघेही काही दिवस उत्तरप्रदेशातील तुरुंगात होते. अलीकडेच हे दोघेही जामिनावर सुटून तुरुंगातून बाहेर आले होते. तुरुंगातून बाहेर येताच दोघांत पुन्हा जमिनीवरून वाद सुरू झाला. उत्तरप्रदेशातील जमिनीचा वाद कल्याणपर्यंत पोहोचला. चुलत भाऊ रंजीत जमिनीचा ताबा सोडत नाही म्हणून रामसागर बदल्याच्या ईर्षेने पेटला होता. त्याने उत्तर प्रदेशातून गावठी बनावटीचा खट्टा खरेदी केला. शिवाय कमरेला त्याने चाकूही लावला होता. रंजीतला कोणत्याही परिस्थितीत संपवायचा विडा उचलून रामसागर कल्याणात दाखल झाला. बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रंजीत हा त्याच्या कल्याणमधील राहत्या इमारतीच्या बाहेर उभा असताना अचानक तेथे रामसागर आला. त्याने रंजीतच्या दिशेने गोळ्या झाडल्या. मात्र जीव वाचविण्यासाठी रंजीत इमारतीच्या चौथ्या माळ्यापर्यंत धावत गेला आणि तेथेच कोसळला. गोळ्या झाडूनही जिवंत असल्याचे पाहून रामसागरने कमरेला खोचलेला धारदार चाकू काढून रंजीतवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत रंजीत ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर हल्लेखोर खूनी रामसागर याने तेथून पळ काढला.
जमिनीवरून सुरू असलेल्या सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच पोलिसांकडे तक्रार अर्ज केले होते. या अर्जांची दखल घेतली जात नव्हती, असे रंजीतच्या कुटुंबीयांनी सांंगितले. या गोळीबार आणि खुनाची माहिती कळताच कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साबाजी नाईक पथकासह रंजीतच्या इमारतीत दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर रंजीतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलकडे पाठवून दिला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासचक्रांना वेग देऊन कल्याणमधून गोळीबार करणारा रामसागर दुबे याला अटक केली. मृत रंजीत दुबे आणि त्याला ठार मारणारा रामसागर दुबे हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.