

डोंबिवली : मध्यरेल्वे मार्गावरील कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलच्या दरवाजात उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या हातावर रेल्वे मार्गात उभे राहून फटका मारायचा. प्रवाशांच्या हातामधील मोबाईल किंवा बॅग खाली पडली की तात्काळ घेऊन पळ काढायचा. अशाप्रकारे रेल्वे मार्गात उभे राहून चोऱ्या करणाऱ्या कल्याण पूर्वेकडील मलंगगड रोडला असलेल्या नांदिवलीतील चोरट्याला अटक करण्यात आले आहे.
सुमित कमलेश सिंग (२६) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. हा चोरटा कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या नांंदिवलीतील गावदेवी इमारतीत राहतो. सुमितच्या विरोधात डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला शुक्रवारी (दि.30 ) रात्री पावणे अकरा वाजता अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून प्रवाशाकडून चोरलेला सोळा हजार रूपये किंमतीचा मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला आहे.
डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जारवाल, उपनिरीक्षक सोनार, भिलारे, तायडे, नष्टे, पवार, सुरक्षा बलाचे विवक पाटील यांनी अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. एक रेल्वे प्रवासी शुक्रवारी संध्याकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी-कल्याण लोकलने प्रवास करत होता. हा प्रवासी सदर धिम्या गतीच्या लोकलमध्ये सामान्य डब्यात दरवाजात उभा राहून कल्याण दिशेने प्रवास करत होता. डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यानंतर रेल्वे मार्गात थांबलेल्या एका इसमाने लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर जोराने फटका मारला. त्या प्रवाशाच्या हातातील सोळा हजार रूपये किंमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल रेल्वे मार्गात पडला. रेल्वे मार्गावर थांबलेला इसम रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी उभा असेल असे प्रवाशांना वाटले. तथापी तो चोर निघाला. मोबाईल रेल्वे मार्गात पडताच प्रवासी अस्वस्थ झाला. लोकल धावत असल्याने प्रवाशाला लोकलमधून उडी मारून चोराला पकडून मोबाईल ताब्यात घेता येत नव्हता. लोकलमधील प्रवाशांनी चोर चोर म्हणून ओरडा ओरडा केला. प्रवाशांचा गलका ऐकून रेल्वे मार्ग परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. पळणाऱ्या इसमाने हातावर फटका मारून मोबाईल लांबविल्याचे प्रवाशांनी पोलिसांना सांगितले. दोन्ही पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पाठलाग करत काही अंतरावर सदर इसमाची गठडी वळली. दोन्ही पोलिसांनी पकडून ठेवलेला हा इसम पळून जाण्यासाठी प्रयत्न करत होता. तथापी पोलिसांनी खाक्या दाखवत त्याला डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले. अंगझडती दरम्यान त्याच्याकडे प्रवाशाचा चोरलेला मोबाईल आढळून आला.