

अंबरनाथ : पैश्याच्या वादातून एका महिलेची भर रस्त्यात चाकू भोसकून हत्या केल्याचा प्रकार अंबरनाथच्या हुतात्मा चौक परिसरात घडला आहे. पोलिसांनी आरोपी रोहित भिंगारकर (29) याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे.
या जगात माणुसकी शिल्लक आहे का? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र अशी ख्याती आहे. पण अंबरनाथ शहरात अशाप्रकराची घटना घडणे यापेक्षा लाजिरवाणी कोणतीच गोष्ट असू शकत नाही. शहराच्या पूर्व भागातील बारकू पाडा परिसरात राहणारी सीमा कांबळे (42) ही महिला केअर टेकरचे काम करत होती. ही महिला आणि आरोपी रोहित भिंगारकर यांच्यात पैश्याचा व्यवहार होता. याच व्यवहारातून रोहित याने सीमा यांना हुतात्मा चौक येथे भेटायला बोलावले होते. हे दोघे हुतात्मा चौक येथून जाणार्या पायर्यांवर बसले होते. त्याच वेळेस या दोघांमध्ये भांडण झाले व रागाच्या भरात रोहित याने आपल्या जवळील चाकूने भर रस्त्यात सीमाच्या पोटात दोन वार केले व तिथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलेला स्थानिक लोकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचाराआधीच तिला मृत्यूने गाठले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला काही वेळातच ताब्यात घेऊन अटक केली. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
सीमा कांबळे व आरोपी रोहित भिंगारकर यांच्यात भांडण सुरू असताना त्या ठिकाणी असलेल्या एका वयस्कर महिलेने त्यांचे भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना न जुमानता त्यांचे भांडण सुरू राहिले व रोहित याने स्वतःजवळील चाकूने या महिलेला भोसकले. मात्र त्याच वेळेस त्या ठिकाणी असलेल्या इतर लोकांनी त्यांचे भांडण थांबवले असते तर या महिलेची हत्या रोखता आली असती. मात्र आपल्याला काय करायचे आहे? या मानसिकतेतून अनेक रोखता येणारे प्रकार रुद्र रूप धारण करतात.