

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या खडकपाड्यातील उच्चभ्रूंच्या लोकवस्तीत मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक धंदे बिनबोभाट चालत असल्याचे खडकपाडा पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणले आहेत. या सेंटरच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या मालक आणि व्यवस्थापकासह अन्य एका कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा सर्कलजवळ असलेल्या राॅक माऊंट गृहसंकुलात मिडास वेलनेस स्पा या नावाने मसाज सेंटर सुरू होते. या सेंटरचे चालक सुनील चव्हाण, व्यवस्थापक जुगेशकुमार महातो (रा. उत्तरप्रदेश) आणि नितीश कुमार कुशवाह (रा. झारखंड) या तिघांच्या विरोधात पोलिस हवालदार गणेश जाधव यांनी स्त्री व मुलींवरील अत्याचार प्रतिबंधक आणि भारतीय न्याय संहिता कायद्यान्वये सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सेंटरवर छापा टाकल्यानंतर पोलिसांना डोंबिवली आणि भिवंडी परिसरात राहणाऱ्या महिला आढळून आल्या. मसाज सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकाकडून सेंटरचे चालक पाच हजार रूपये शुल्क आकारत होते. या शुल्कातील दोन हजार ग्राहकाशी शरीरसंबंध करणाऱ्या महिलेला दिले जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.
खडकपाडा सर्कलजवळ मिडास वेलनेस स्पामध्ये या मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल भुजबळ, हवालदार एम. जे. पाटील, पावस्कर, बेंडकोळी या पथकाने तपास सुरू केला. त्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक तयार केले. ग्राहक मसाज सेंटरमध्ये जाताच पोलिसांनी बाहेर साध्या वेशात सापळा लावला होता.
सेंटरच्या चालकाकडून बनावट ग्राहककडे पाच हजार रूपयांची मागणी करण्यात आली. शरीरसंबंधासाठी महिलेची व्यवस्था करण्यात आली. बनावट ग्राहकाने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे सापळा लावलेल्या पोलिसांनी मसाज सेंटरमध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. यावेळी सेंटरमध्ये दोन महिला एका बंद खोलीत संशयास्पद स्थितीत आढळून आल्या. सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री पटल्यानंतर सेंटरमधील चौघांना ताब्यात घेतले. स्वत:च्या फायद्याकरिता महिलांना ग्राहकांबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास सांगून त्या माध्यमातून पैसे मिळवून त्याच्या स्वत:साठी उपयोग करून घेतला म्हणून पोलिसांनी सेंटर चालकासह दोन कर्मचाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.