

डोंबिवली : अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय सुशिक्षितांची नगरी म्हणून बिरूदावली लावून मिरवणार्या डोंबिवलीतील दोघा नोकरदार गृहस्थांना आला.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास गलेलठ्ठ रक्कम मिळेल, अशी आमिषे दाखवून बदमाशांनी ऑनलाईनच्या माध्यमातून डोंबिवलीतील वेगवेगळ्या दोघा नोकरदारांची वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण एक कोटी 31 लाखांची फसवणूक केल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारींतून उघडकीस आले आहे. यातील एका नोकरदाराला 82 लाख 61 हजार, तर दुसर्या नोकरदाराला 48 लाख 77 हजार रूपयांचा चुना लावल्याचे फिर्यादींमध्ये म्हटले आहे.
जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत फसवणुकीच्या दोन्ही घटना घडल्या आहेत. या प्रकरणी फसगत झालेल्या नोकरदारांनी मानपाडा आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्यन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या संदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील माहिती अशी की, फसवणूक झालेले एक नोकरदार आपल्या कुटुंबियांसह पलावा गृहसंकुल परिसरात राहत असून ते मुंबईत नोकरी करतात. जुलैमध्ये घरी असताना त्यांना अनोळखी महिलेने संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास डिसेंबर अखेरपर्यंत तुम्हाला 700 टक्के नफा मिळून देतो, असे अमिष दाखविले. इतका फायदा होणार असल्याची संधी चालून आल्याने तक्रारदाराने होकार दर्शवला. अनोळखी इसमांनी गुंतवणुकीसंंदर्भात विविध प्रकारची माहिती देऊन तक्रारदाराला लिंक पाठवली. तसेच अनोळखी इसमांनी दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाईनच्या माध्यमातून भरणा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे नोकरदाराने 82 लाख 75 हजारांची रक्कम संबंधितांकडे नोव्हेंबरपर्यंत भरणा केली. या रकमेवर नोकरदाराने अधिकचा परतावा मागण्यास सुरूवात केली.
अनोळखी इसम रक्कम परत मिळण्यासाठी अधिकची रक्कम तक्रारदाराला भरण्यास भाग पाडत होते. मात्र गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत करण्यासाठी तक्रारदाराने तगादा लावला. त्याला अनोळखी इसमांनी नकार दिला. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर नोकरदाराने मानपाडा पोलिस ठाण्यात कागदोपत्री पुराव्यांसह धाव घेऊन तक्रार दाखल केली.
दुसर्या घटनेत टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील माहिती अशी की, यातील तक्रारदार गृहस्थ पाथर्ली परिसरात राहत असून त्यांच्या बाबतीत जुलै ते नोव्हेंबर कालावधीत हा प्रकार घडला आहे. तीन अनोळखी इसमांनी तक्रारदाराला शेअर बाजार आणि आयपीओ गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिकचा परतावा देण्याचे अमिष दाखविले. या अमिषाला भुलून नोकरदाराने 48 लाख 72 हजार रूपये ऑनलाईनच्या माध्यमातून तीन इसमांनी दिलेल्या बँक खात्यावर जमा केले. ही रक्कम परत मिळण्यासाठी तीन इसमांकडून टाळाटाळ सुरू होताच, आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर नोकरदाराने कागदोपत्री पुराव्यांसह तातडीने टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.