Thane Crime | तामसीपणाचा कळस! भारतीय राष्ट्रीय पक्ष्यावर ताव मारण्यासाठी त्याने केली हत्या

कल्याणजवळच्या रूंदे गावात मोराची हत्या करुन बनवले मटण ; अटक, 3 दिवसांची वन कोठडी
डोंबिवली, ठाणे
गणेश श्रावण फसाळे असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. (छाया : बजरंग वाळुंज)
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण तालुक्यातील कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या रूंदे गावच्या हद्दीतील आदिवासी वाडीतून एका इसमाला कल्याण (खडवली) वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.8) अटक केली आहे. या इसमाने मोराची शिकार केल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

Summary

गणेश श्रावण फसाळे (35, रा. रूंदे, आदिवासी पाडा, ता. कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. कल्याण जिल्हा न्यायालयात रविवारी (दि.9) सुट्टीकालीन न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

गणेश फसाळे हा वीटभट्टीवर मजूरी करतो. कल्याण वनपरिक्षेत्रातील फळेगाव वन विभागात मोराची शिकार होत असल्याची माहिती खासगी गुप्तहेरांकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ठाणे उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वन परिक्षेत्र अधिकारी, खडवली वन परिमंडळाचे अधिकारी शनिवारी (दि.8) रात्री साडे अकरा वाजता कल्याण मुरबाड रस्त्यावरील रूंदे गाव हद्दीत पोहोचले.

मोराची हत्या करुन बनवले मटण

गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांनी वीट भट्टीवर काम करणाऱ्या गणेश फसाळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. गणेश याने जंगलात मोराची शिकार केल्याची कबुली वनाधिकाऱ्यांना दिली. हत्या केलेल्या मोराचे अवयव चुलीवरच्या एका पातेल्यात शिजवल्याचे गणेशने वनाधिकाऱ्यांना सांगितले. वन अधिकाऱ्यांनी मोराच्या मटणाचे पातेले आणि मोराचे अवशेष घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केले आहे.

वनाधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल

मोराची हत्या केल्याने रूंदे गाव हद्दीतील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वनाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.8) रात्रीच गणेश फसाळे याला ताब्यात घेऊन कल्याण वन परिक्षेत्र कार्यालयात आणले. गणेश याने संरक्षित असलेल्या राष्ट्रीय पक्ष्याची शिकार केल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियमाने त्याच्यावर वनाधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

रूंदे गाव हद्दीतील जंगलात गणेशने मोराची शिकार केली होती. त्याने मोराची हत्या करून शिजवलेले मटण खाण्यासाठी तयार केले होते. हे सर्व पुराव्यानिशी सिध्द झाल्याने वनाधिकाऱ्यांनी रविवारी (दि.9) सकाळी गणेश फसाळे याला कल्याण जिल्हा न्यायालयात न्यादंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवस वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रीय संपत्तीचा शिकाऱ्यांकडून विनाश

फेब्रवारी ते जून अखेरपर्यंत ठाणे जिल्ह्याच्या जंगल भागात दिवसा, तसेच रात्री शिकाऱ्यांच्या टोळ्या प्रखर प्रकाश झोताच्या बॅटऱ्या घेऊन भेकर, ससे, मोर, डुक्कर, लाहोऱ्या मारण्यासाठी फिरत असतात. शिकारीसाठी प्राणी जंगलात, झाडा-झुडपांत रात्रीच्या वेळेत दिसावे म्हणून हेच शिकारी जंगलांना वणवे लावत असल्याचे वनाधिकाऱ्यांच्या पाहणीत निष्पन्न झाले आहे.

राष्ट्रीय संपत्तीचा विनाश शिकाऱ्यांकडून केला जात असल्याने जागरूक नागरिकांसह पर्यावरणप्रेमींनी जंगलात कुणी आणि कोठेही वणवा लावत असेल, प्राण्यांची शिकार करत असेल तर त्याची माहिती वनाधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news