

डोंबिवली : कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी सराईत दुचाकी चोराला अटक करण्यात यश मिळविले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या कारवाई दरम्यान या चोरट्याकडून चोरलेली स्कूटर हस्तगत केली असून पोलिस रेकॉर्डवरील या सराईत चोरट्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पियुष मधूकर जाधव (२०, रा. अमुल निवास, काटेमानीवली नाका, कल्याण-पश्चीम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कल्याणात दुचाक्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या वाहन चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि दर्शन पाटील, हवा. मिलींद बोरसे, राजेश कापडी, भागवत सैंदाणे, भगवान सांगळे, विलास जरग, नरेश दळवी, दिलीप सोनावळे, प्रदिप गिते हे पथक चोरांना जंग जंग पछाडत होते. या पथकाने लोकग्राम सर्कल जवळ मंगळवारी दुपारपासून सापळा लावला होता. या सापळ्यात सायंकाळी साडेसातच्या सुमारास पियुष जाधव हा अलगद अडकला. त्याच्याकडून एम एच ०४/ एल यू /३१९४ क्रमांकाची नवी कोरी स्कूटर हस्तगत केली. चौकशी दरम्यान अटक करण्यात आलेला पियुष जाधव हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत दुचाकी चोर असल्याचे उघडकीस आले. त्याने या पूर्वी कुठून आणि किती दुचाक्या चोरल्या आहेत ? त्याच्या विरोधात अन्य पोलिस ठाण्यांतून गुन्हे दाखल आहेत का ? त्याचे अन्य कुणी साथीदार आहेत का ? चोरलेल्या दुचाक्या कुणाला विकल्या आहेत का ? आदी प्रश्नांची उकल करण्यासाठी पोलिसांनी चौकस तपास सुरू केला आहे.