

डोंबिवली : गुन्हेगारांनी आता लुटमारीसाठी अनोख्या फंड्याचा वापर सुरू केल्याचे एका घटनेतून उजेडात आले आहे. काळी वस्त्रे परिधान करून हातभार वाढवलेली दाढी, हातात ध्वजदंड, चेहऱ्याला फासलेले भस्म, अशा साधूची वेशभुषा करून जेष्ठ नागरिकांकडून संमोहनाद्वारे हातचलाखीने सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या तिघा बदमाशांना मानपाडा पोलिसांनी मोठ्या कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत. कारजवळ बोलवून ज्येष्ठाशी संवाद साधतानाच त्याच्यावर भुरळ पाडून त्याच्याकडील सोन्याचे दागिने अगदी सहजासहजी लंपास करणाऱ्या अघोरी बाबाने पोलिसांपुढे गुडघे टेकले आहे.
राहूल धालनाथ भाटी उर्फ मदारी (२९, रा. गणेशपुरा, भरवाळ नगर, ता. देगाव, गांधीनगर, गुजरात), आशिष दिलीपनाथ मदारी (२०, रा. मु. पो. आलोळ, अराधरोड, रामदेवजी मदीराच्या मागे, ता. आलोळ, जि. पंचमहाल, गुजरात. सध्या रा. जय मल्हार हॉटेल मागील झोपडपटटी, गोवेनाका, कोनगाव, ता. भिवंडी) आणि लखन आबा निकम (३४, रा. मु. पो. आडेगाव, ता. म्हाडा, जि. सोलापूर. सध्या रा. मु. पो. वाघोली-कसेनंद, दत्तात्रय हरगुडे यांची बिल्डींग, काळुबाई मंदिराचे मागे, ता. हावेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या संदर्भात हकीकत अशी की, बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास माधव दिवाकर जोशी (७५) हे खोणी पलावातील वेटलॅन्ड पार्क जवळ भाजी खरेदी करून घरी चालले होते. इतक्यात तीन अनोळखी इसमांनी एका पांढन्या रंगाचे कारमधून येऊन माधव जोशी यांना हटकले. त्यांच्यापैकी एक इसम साधूच्या वेशभूषेत होता. त्याने माधव यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हातचलाखी करत माधव यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व १० ग्रॅम वजनाची अंगठी घेऊन पलायन केले. माधव जोशी यांनी या संदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम चोपडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश राळेभात, संपत फडोळ, सागर चव्हाण, हवा. राजेंद्र खिलारे, यल्लाप्पा पाटील, सचिन साळवे, सुनील पवार, विकास माळी आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कारचा नंबर शोधून काढला. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास चक्रांना वेग देऊन भिवंडीतील कोनगाव येथून या पथकाने तिन्ही बदमाशांना ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान या तिन्ही बदमाश्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यातील राहूल भाटी उर्फ मदारी हा अघोरी बाबाची वेशभूषा करून ज्येष्ठ नागरिकांना संमोहित करायचा. तर अन्य दोघेजण त्याला साथ द्यायचे. मात्र याच राहूल भाटीची जादू पोलिसांपुढे फिकी पडली. त्याने माधव जोशी यांना लुटल्याची कबुली दिली. या तिन्ही बदमाशांकडून माधव जोशी यांच्याकडील लुटलेले १ लाख २० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली एम एच ०३ /सी एच/ ३९३२ क्रमांकाची कार जप्त केली आहे. या त्रिकूटाने अशा पद्धतीने यापूर्वी गुन्हे केले आहेत का ? अगर चोऱ्या/लुटमार वा तत्सम प्रकारचे गुन्हे केल्याच्या नोंदी अन्य पोलिस ठाण्यांत दाखल आहेत का ? याचाही चौकस तपास मानपाडा पोलिस करत आहेत.