

ठाणे : अल्पवयीन मुलगा वाहन चालवीत असल्याचा स्टंट करणे वाहन मालकाला महागात पडले आहे. सदरचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हीडिओत अल्पवयीन चालक वाहन चालवीत असतानाच चारचाकी वाहनात शाळकरी मुले असल्याचेही दिसत असल्याने याची गंभीर दखल वाहतूक पोलिसांनी घेत वाहन चालकाला आणि वाहन मालकाला प्रत्येकी 5 हजार रुपये असा 10 हजाराची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती वाहतूक पोलीस सूत्रांनी दिली.
वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या व्यक्तीला वाहन मालकांनी आपले वाहन देऊ नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. नुकताच सोशल मीडियावर चारचाकी वाहन एक शाळकरी मुलगा चालवत असून त्याच्यासोबत काही शाळकरी मुले गाडीत बसली आहेत. हा कसारवडवली परिसरातील असल्याने वाहतूक पोलिसांनी त्या गाडी मालक आणि चालकाचा शोध घेत कारवाई केली आहे. चालकावर मोटार परिवहन कायदा कलम 4(1)/181 अन्वये तसेच वाहनाचे मालक वर देखील मो.प. कायदा कलम 5/180 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या दोन्ही कलमानुसार प्रत्येकी 5 हजार रुपये असा दहा हजार रुपये दंड वसूल केला आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी परवाना नसलेल्या कोणालाही आपले वाहन देऊ नये असे आवाहन करताना, मग तो अल्पवयीन असो मोठा असो या वयोवृद्ध असो. विना परवाना वाहन चालवताना जर एखादी घटना घडल्यास त्याला मालक म्हणून आपण जबाबदार असाल. शिवाय आपल्यावर कारवाईला सामोरे जावे लागले. असे ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी बोलताना सांगितले.