

ठाणे : कोऱ्या कागदावर सह्या केल्या नाहीत, तर परळीतून बाहेर जाऊ दिले जाणार नाही, अशी धमकी देत मंत्री धनंजय मुंडे यांचा नोकर गोविंद मुंडे आणि त्याच्या माणसांनी परळीतील साडेतीन कोटींची 64 गुंठे जमीन केवळ 21 लाख रुपयांमध्ये हडप केल्याचा गंभीर आरोप भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू कै. प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे. त्यांनी बुधवारी (दि.8) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून लेखी पत्र सादर केले. या प्रकरणी परळी पोलीसांनी चौकशी सुरु केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या महिन्याभरापूरापूर्वी महाजन यांनी आरोप केला होता. आता सारंगी महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 'आमच्या जमिनीची बाजारभावानुसार किंमत साडे तीन कोटी रुपयांच्या घरात जाते. पण ती धमकावून केवळ 21 लाखांना घेण्यात आली. परळीत बोलावून कोऱ्या कागदांवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. स्वाक्षरी केल्याशिवाय परळीबाहेर पडू देणार नाही, अशी धमकी धनंजय मुंडे यांच्या माणसांनी दिली होती,' असा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी 18 ऑक्टोबर 2024 रोजी महाजन यांनी आरोप करीत पोलिस तक्रार केलेली आहे. त्यानुसार परळी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. कै. प्रवीण महाजन यांच्या नावावर असलेली बिडकीन, नांदेड, बुटीबुरी अनिस संभाजीनगर येथील जमीन पुन्हा मिळवून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
धनंजय मुंडे यांच्या घरी नोकर आहे. त्याच्या नावावर ही जमीन करण्यात आली. त्याने ठाण्यात येऊनही माझ्याकडून जबरदस्तीने एक लाख रुपये नेले आहेत. गोविंद मुंडे याच्याकडे मोठा बंगला, चार गाड्या, परळीत फार्म हाऊस, मोठ्या प्रमाणावर शेती आणि शेताजवळ स्टोन क्रशर आहे. एवढी संपत्ती कुठून आली, याचीही चौकशी करण्याची मागणी महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे कली आहे.
गोविंद मुंडे यांच्याशी काहीही सबंध नाही कै. प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांची जमीन खरेदी करणारा गोविंद मुंडे यांच्याशी माझा काही संबंध नसून त्यांचा जमीन खरेदी व्यवहार मला माहिती देखील नव्हता. तो माझा नोकर नसून त्याच्याशी काहीही संबंध नाही.
धनंजय मुंडे, मंत्री
महाजन यांचे आरोप बिनबुडाचे मी मुंडे यांचा नोकर नसून प्रतिष्ठित व्यापारी आहे. सारंगी महाजन यांचे आरोप बिनबुडाचे असून नाहक बदनामी करीत आहेत. दोन वर्षापूर्वी हा रीतसर खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला असून त्या स्वतःहून आल्या आणि नोंदणी केलेली आहे कुठेही फसवून व्यवहार झालेला नाही. महाजन यांनी कोर्टात दावा दाखल केला असून त्याला मी आव्हान दिले आहे.
गोविंद मुंडे, खरेदीदार