Thane Crime | अंबरनाथच्या डावलपाड्यातील म्हात्रे कुटुंबीयांना खून खटल्यात जन्मठेप
डोंबिवली : अंबरनाथ तालुक्यात मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या मांगरूळ गावाजवळील डावलपाड्यात राहणाऱ्या म्हात्रे कुटुंबीयांतील सहा जणांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. या व्यतिरिक्त खुनाच्या प्रयत्नासह इतर प्रत्येक गुन्ह्यात सहाही आरोपींना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 70 हजार रूपये दंड ठोठावला आहे. गेल्या 7 वर्षांपासून हा खटला कल्याण न्यायालयात सुरू होता.
या खटल्यात डावलपाड्यातील शेतकरी सुरेश सावळाराम म्हात्रे, रमेश सावळाराम म्हात्रे, शत्रुघ्न सुरेश म्हात्रे, जितीन सुरेश म्हात्रे, प्रमोद रमेश म्हात्रे, दर्शन सुरेश म्हात्रे यांना जन्मठेप आणि इतर गुन्ह्यात प्रत्येकी 10 वर्ष शिक्षा भोगावी लागणार आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संगीता फड, तर आरोपींतर्फे ॲड. जी. बी. चव्हाण, ॲड. ए. वाय. पत्की यांनी काम पाहिले. 15 जखमींच्या साक्षी आणि सबळ पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने हा निर्णय दिल्याचे ॲड. संगीता फड यांनी सांगितले.
3 मार्च 2018 रोजी आरोपींनी डावलपाड्यातील ज्ञानदेव राघो राणे यांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला होता. त्याच बरोबर दत्ता आणि त्यांचे वडील अनंता यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. राणे कुटुंबातील महिलांना आरोपींनी लाकडी दांडके, फावडे, कुऱ्हाडी, दगड-विटांचा वापर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्याप्रकरणी राणे कुटुंबीयांनी हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
विशेष सरकारी वकील ॲड. संगीता फड यांनी सांगितले, राणे आणि म्हात्रे कुटुंबीय डावलपाडा गावात एकमेकांच्या शेजारी राहतात. गावात सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटाराची व्यवस्था नाही. राणे कुटुंबीयांनी घरासमोरील अंगणात कपडे धुतले किंवा सफाईसाठी पाणी ओतले की ते सांडपाणी शेजारच्या सुरेश म्हात्रे यांच्या घरासमोरून वाहत असे. यावरून राणे आणि म्हात्रे कुटुंबीयांमध्ये कुरबुऱ्या सुरू होत्या. 3 मार्च 2018 रोजी राणे कुटुंबीयांतील पुष्पा, माधुरी आणि दर्शना या तिघी घरासमोर उभ्या असताना दर्शन म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे यांनी त्यांच्या बरोबर घरासमोरून वाहणाऱ्या सांडपाण्यावरून भांडण सुरू केले. त्यावेळी राणे कुटुंबीयांमधील ज्ञानदेव राणे आणि अनंता राणे हे दोघे म्हात्रे कुटुंबीयांतील महिलांना शिवीगाळ करू नका, म्हणून समजविण्यासाठी गेले. म्हात्रे कुटुंबीयांनी राणे यांच्या घराकडून वाहत येणारे पाणी आपल्या दारासमोरून वाहू नये म्हणून तेथे दगड आणि दगडी भुकटीचा बांधा घालून पाणी राणे यांच्या घरासमोर तुंबून राहील अशी व्यवस्था केली.
घरासमोर पाणी तुंबून राहू लागल्याने राणे कुटुंबीयांनी म्हात्रे यांना तो बांध काढण्याची सूचना केली. तथापी म्हात्रे कुटुंबीयांंनी त्यास नकार दिला. सांडपाण्यावरून संतप्त झालेल्या सुरेश म्हात्रे, जितीन म्हात्रे आणि शत्रुघ्न म्हात्रे यांनी हातात कुऱ्हाड, दांडके घेतले. यावेळी रमेश म्हात्रे यांनी आता राणे कुटुंबीयांना संपून टाकायचे अशी चिथावणी इतर आरोपींना दिली. सुरेश आणि इतरांनी ज्ञानदेव राणे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले. दत्ता राणे, अनंता राणे आणि नाना राणे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. राणे कुटुंबीयांमधील महिलांसह 15 जणांना गंभीर जखमी केले. तीन दिवस रूग्णालयात उपचार सुरू असतानाच ज्ञानदेव यांचा मृत्यू झाला. हिललाईन पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक केली. या खून खटल्याचा निकाल लागला आहे.

