

डोंबिवली (ठाणे) : आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू - शिख महापरिषदेचे उपाध्यक्ष आणि काशी विद्वत परिषदेचे प्रभारी, हभप नामदेव महाराज हरड यांना जीवे मारण्याची धमकी येत असल्याची तक्रार त्यांनी मुरबाड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. मुरबाड तालुक्यातील नागाव येथे ते वास्तव्यास असून, त्यांच्या मालकीच्या जमिनीवर काही जण बेकायदेशीरपणे बांधकाम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नामदेव महाराजांच्या नावे असलेल्या गट क्र. ७, क्षेत्र ३५ आर या जमिनीवर संबंधित व्यक्तींनी घराची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली सिमेंट पत्रे व लोखंडी पाईपद्वारे पक्के बांधकाम सुरू केले. ही माहिती मिळाल्यानंतर नामदेव महाराजांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली. ग्रामसेवक पाहणीसाठी गेले असता, संबंधित लोकांनी घरात लपून प्रशासनाच्या आदेशाला दाद दिली नाही.
त्यानंतर नामदेव महाराजांना शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या प्रकारामुळे त्यांनी ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि स्थानिक पोलिस ठाण्याकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. संबंधित व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, आपली अवस्था संतोष देशमुख यांच्यासारखी होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी तक्रारीत व्यक्त केली आहे. मुरबाड पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तथापि, नामदेव महाराजांनी संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाकडे नामदेव महाराजांचे कुटुंबीय व हरिभक्तांचे लक्ष लागून आहे.