

डोंबिवली : कल्याणमध्ये गेल्या चार महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षा चोरणारा बदमाश कोळसेवाडी पोलिसांच्या हाती लागला आहे. काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या कोळेगावात राहणाऱ्या या बदमाश्याकडून आतापर्यंत 4 रिक्षा हस्तगत केल्या आहेत. बाजारपेठसह कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील 4 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरलेल्या रिक्षा चोरट्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात लपून ठेवल्या होत्या.
राजेंद्र आजीनाथ जाधव (42) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून तो पोलिसांच्या अभिलेखावरील नामचीन गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी व्यक्त केली.
कल्याण पश्चिमेकडे बाजारपेठ, तर पूर्वेकडे कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार महिन्यांपासून घरासमोरील मोकळ्या जागेत, तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या रिक्षा रात्रीच्या सुमारास चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. कोळसेवाडी आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यात रिक्षा चालकांनी तशा तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक साबाजी नाईक, सपोनि दर्शन पाटील, सपोनि संदीप भालेराव, हवा. सचिन कदम, विशाल वाघ, भगवान सांगळे, गोरक्षनाथ घुगे, विकास भामरे, सुरेंद्र इंगळे यांच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली. एका गुन्ह्यात सराईत चोरट्याची चौकशी सुरू असताना त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोळेगावात राहणारा राजेंद्र जाधव हा रिक्षांच्या चोऱ्या करत असल्याची माहिती पुढे आली.
राजेंद्र जाधव हा कल्याण पूर्वेतील 100 फुटी रोडला संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पळण्याची संधी न देता झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. अटक आरोपी राजेंद्र जाधव याने कल्याणमध्ये कोळसेवाडी हद्दीत तीन, तर बाजारपेठ हद्दीत एक रिक्षा चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या रिक्षा पोलिसांनी अहिल्यानगर येथील कर्जत तालुक्यातून ताब्यात घेतल्या आहेत. त्याने अन्य काही गुन्हे केले असण्याची शक्यता असल्याने त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्याच्याकडून आत्तापर्यंत 1 लाख 90 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.