

डोंबिवली : मध्य रेल्वेमार्गावरील स्थानकांत उच्छाद मांडणाऱ्या वैशाली सचदेव या २७ वर्षीय चोरट्या तरूणीला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या कौशल्याने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
भोळ्या-भाबड्या चेहऱ्याच्या मागे लपलेल्या वैशालीचा बुरखा फाटला असून तिचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. रेल्वे स्थानकांत घाईत असताना किंंवा लोकलमध्ये चढताना महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज, हातामधील पैशांची पर्स, मोबाईल सारखे मौल्यवान ऐवज हिसकावून पलायन करण्यात सराईत असलेल्या वैशाली सचदेव या चोरट्या महिलेकडून लोहमार्ग पोलिसांनी चोरलेला सोन्याचा ऐवज व मोबाईल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेली वैशाली सचदेव ही पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणांत पोलिस तिला जंग जंग पछाडत होते. गेल्या काही महिन्यांपासून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, आसनगाव, ठाणे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या महिलांच्या डब्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. महिलांच्या हातातील पर्स, मोबाईल, अंगावरील दागिने हिसकावल्याच्या तक्रारी महिला प्रवाशांकडून कल्याण आणि डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यांत दाखल झाल्या होत्या. अचानक महिलांच्या डब्यात चोऱ्या वाढल्याने लोहमार्ग पोलिस चक्रावून गेले होते. महिलांच्या डब्यांमध्ये चोऱ्या करण्याची चोरट्या महिलेची पध्दत एकच होती. त्यामुळे ठराविक महिलाच या चोऱ्या करत असल्याचा पोलिसांना संशय होता.
डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी महिला डब्यांवर पाळत ठेऊन या डब्यात चोऱ्या करणाऱ्या महिलेच्या अटकेसाठी जाळे विणले होते. बुधवारी (दि.30 एप्रिल) संध्याकाळी सीएसएमटी-आसनगाव लोकल डोंबिवली स्थानकातून आसनगावच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी काही महिलांना आपल्या पर्समधील पैसे, मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. सर्व महिला प्रवाशांनी ओरडाओरडा केला. लोकल डब्यातील कोणीतरी चोरट्या महिलेनेच हे कृत्य केले असावे, असा प्रवासी महिलांना संशय आला. चोरीची कुजबुज सुरू असतानाच डब्यात एक महिला प्रवासी म्हणून संशयास्पद स्थितीत उभी होती. महिला प्रवाशांनी त्या महिलेला जाब विचारताच ती गडबडून गेली. डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरून ही महिला पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच डब्यातील महिलांनी गोंगाट केला आणि त्या महिलेला पकडून ठेवले. फलाटावरील पोलिसांनी महिलांचा आरडा-ओरडा ऐकून धाव घेऊन त्या महिलेला ताब्यात घेतले.
पोलिस ठाण्यात आणून अंगझडती घेतली असता तिच्याजवळ महागड्या मोबाईलसह चोरीचा ऐवज सापडला. ही महिला सराईत चोर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर भागात राहणाऱ्या प्रियंका प्रकाश गांगुर्डे या रविवारी संध्याकाळी कल्याण रेल्वे स्थानकातून रेल्वे घाटकोपर रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करत असताना त्यांच्या गळ्यातील आठ तोळ्याचे चार लाख रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरले आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्यात या संदर्भात प्रियांका यांनी तक्रार दाखल केली आहे. साळसूदपणाचा आव आणण्यासाठी भोळाभाबडा चेहरा करून महिलांच्या डब्यांमध्ये प्रवाशाची भूमिका वाठविणाऱ्या वैशाली सचदेव या चोरट्या महिलेच्या विरोधात अनेक पोलिस ठाण्यांतून गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच खास पथक चौकस तपास करत आहे.