

Mira Road Air Hostess Assault Case
मिरा रोड (ठाणे) : भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत एका एअरहोस्टेस तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.
मिरा रोडमध्ये 23 वर्षाची एअरहोस्टेस तरुणी व तिचा मित्र आरोपी हे 29 जून रोजी युनायटेड किंगडममधून लंडन ते मुंबई या विमानात बरोबर आले होते.
मुंबईत आल्यानंतर तिच्या मित्राने व पीडितेनी पार्टी केली. त्यानंतर पीडिता त्याच्यावर विश्वास ठेवून ती मिरारोड येथील आरोपीच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपीने मध्यरात्री तीनच्या सुमारास पीडितेचे शोषण करून जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून 18 जुलै रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी देखील विमान सेवेत क्रु मेंबर
गुन्हा दाखल होताच आरोपी हा कायमस्वरूपी भारत सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता. याची पोलिसांना माहिती मिळताच नवघर पोलिसांनी दक्षता विभाग मुंबई, आंतरराष्ट्रीय विमानतळ व सहार पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधत त्याला विमानतळावर अटक केली. हाँगकाँग येथे जाऊन त्याठिकाणी दुसर्या एअरलाईन्स कंपनीत नोकरी लागली होती, तसेच तेथे जाण्यासाठी व्हिसासुद्धा त्याने घेतला होता. आरोपी हा राजस्थान येथील असून भारतीय विमान सेवेत क्रु मेंबर म्हणून काम करत आहे.
आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडेमाळी हे करत आहेत.