

डोंबिवली : डोंबिवली जवळच्या देसले पाड्यात राहणाऱ्या ३० वर्षीय तरूणाला ऑनलाईन गेमचे व्यसन जडले होते. गेमच्या माध्यमातून आपल्याला बक्कळ पैसा मिळेल, अशी या तरूणाला आशा होती. तथापी हेच गेम त्याच्या जीवावर बेतले आहेत.
गेम खेळण्यासाठी त्याने वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. वित्तीय संस्थांनी दिलेले कर्ज हा तरूण दिलेल्या वेळेत फेडू शकत नव्हता. संस्थांनी वसूलीसाठी या तरूणाच्या भोवती सासेमिरा लावला होता. कर्जाच्या खाईत लोटलेल्या या तरूणाने शेवटचे पाऊल उचलले आणि राहत्या घरात विषारी रसायन पिऊन त्यानं सगळचं संपवून टाकलं.
मोहित त्रिवेंद्र पुन्दीर (३०) असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मुंब्य्रात राहणाऱ्या फैजान शेख नामक तरूणाने मानपाडा पोलिस ठाण्यात दिली. या माहितीनुसार पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला आहे. गुरूवारी सकाळी मोहित पुन्दीर याने ॲल्युमिनिअम फाॅस्फराईड नावाचे घातक रसायन प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याचे पोलिस ठाण्यातील नोंदीत म्हटले आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहित पुन्दीर याला ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. या गेमच्या पूर्ततेसाठी पैसे लागत होते. हे पैसे उभे करण्यासाठी मोहितने वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. अनेक संस्थांकडून घेतलेले कर्ज मोहित ठरलेल्या वेळेत फेडू शकत नव्हता. देणेकरी संस्थांनी वसूलीसाठी मोहितच्या मागे तगादा लावला होता. आपण वेळेत कर्ज फेडू शकत नाहीत. एवढी रक्कम आपण उभी करायची कशी ? असे अनेक प्रश्न मोहितला सतावत होते.
कर्जबाजारी झालेला मोहित चिंताग्रस्त झाला होता. गुरूवारी (दि.29) सकाळी सहाच्या सुमारास देसलेपाड्यातील राहत्या घरात मोहितने ॲल्युमिनिअम फाॅस्फराईड नावाचे घातक रसायन प्राशन केले. लागलीच त्याला उलट्यांसह त्रास सुरू झाले. त्याला निकटवर्तीयांनी डोंबिवली एमआयडीसीतील निवासी विभागात असलेल्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मोहिमतला धोक्याच्या बाहेर आणण्यासाठी तेथील डाॅक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तथापी उपचारांना प्रतिसाद देण्यात असमर्थ ठरलेल्या मोहितने दुपारी शेवटचा श्वास घेतला. या संदर्भात मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ पाऊलबुध्दे अधिक तपास करत आहेत.