

नेवाळी (ठाणे): कल्याण ग्रामीण भागातील केमिकल माफियांचा हैदोस थांबता थांबेनासा झाला आहे. 14 गावांमधील ठाकूरपाडा डोंगर सध्या केमिकल माफियांना आंदण दिला आहे कि काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.
डोंगरावर सर्रास विविध रासायनिक पदार्थ जमिनीत गाडून उघड्यावर देखील पेटविण्याची सत्र सुरु आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण महामंडळासह महसूल विभागाकडे देखील संबंधित परिसराकडे दुर्लक्ष केल्याने 14 गावांच्या परिसराचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्यातील चर्चेत असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील घातक रसायन हे ठाणे तालुक्यातील ठाकूरपाडा डोंगरावर जमिनीत पुरलं जात आहे. मात्र संबंधित प्रकार नवी मुंबई प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरु आहे. त्यामुळे महसूल विभागाकडे कानाडोळा केल्याने सध्या केमिकल माफियांनी जोमानं हैदोस घालायला सुरुवात केली आहे.
परिसरात दिवस रात्र घातक रसायनांची होळी करणार्या टोळ्या या परिसरात सक्रिय आहेत. तर डोंगरावर असणार्या खदान मध्ये देखील प्रदूषणाचे अड्डे तयार करण्यात आले आहेत. परिसराच्या सुरक्षेला धोका निर्माण या केमिकल माफियांनी केला आहे. मात्र अत्यंत गंभीर बाबीकडे शासकीय यंत्रणांनाच दुर्लक्ष अत्यंत चिंतेची बाब निर्माण झाली आहे.
ठाणे तालुक्यातील 14 गावांच्या डोक्यावर प्रदूषणाचे ढग निर्माण करणार्या केमिकल माफियांनी दहशत देखील माजविण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषणाचा त्रास होत असल्यानं विरोध करणार्या आदिवासी महिलांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर देखील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कोणत्याही प्रकारची कारवाई साठी पाऊल उचलण्यास प्रशासनाला भाग पाडलं जात नसल्याने केमिकल माफियांकडून हैदोस जोमानं सुरु ठेवण्यात आलं आहे.