

भिवंडी : 23 वर्षीय तरुणीने 24 वर्षीय शेजार्यास प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने सुर्याने तरुणीची निर्घृण हत्या केली. मोठ्या बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या लहान बहिणीलाही सुर्याने वार करून गंभीर जखमी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना भादवड गावातील कानिफनाथ मंदिराजवळील कृष्णानगर मधील एका चाळीत घडली आहे.
याप्रकरणी आरोपीच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. नितु भान सिंग (23) असे मयत झालेल्या पीडित तरुणीचे नाव आहे. तर राजू सिंग (24) असे हत्या करणार्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हत्यारा हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून मयत तरुणी मूळची उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील ग्राम नेवादा मधील असून सद्यस्थितीत कुटुंबासोबत येथील भादवड गावातील कृष्णानगर मधील भरत तरे यांच्या चाळीतील एका भाड्याच्या खोलीत राहत आहे. आणि आरोपीही मयत तरुणीच्या शेजारी राहत आहे. दरम्यान तरुणीने शेजार्याला प्रेमसंबंधास नकार दिला होता. याच रागातून 28 ऑक्टोबर रोजी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास राजूने नितु घरी एकटी असताना भाजी कापण्याच्या सुर्याने नितुच्या शरीरावर सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. यासह मयत नितुची लहान बहिण रितूने नितुला वाचवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने रीतुच्या बोटाजवळ सुर्याने वार करून तिलाही जखमी केले आहे.
याप्रकरणी मयत नितुच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भान्यासं कलम 103, 333, 118(1) सह मपोकाक 37 (1), 135 न्वये राजूच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांची कुणकुण लागताच राजू घटना स्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल अडुरकर करीत आहेत.