दहशतवाद्यांच्या शोधात 'जहरखुरानी'चा पर्दाफाश; मुंबई-ठाण्यासह देशभरातील नेटवर्क रडारवर

terror search exposes zaharkhurani
दहशतवाद्यांच्या शोधात 'जहरखुरानी'चा पर्दाफाश; मुंबई-ठाण्यासह देशभरातील नेटवर्क रडारवरFile Photo
Published on
Updated on

नरेंद्र राठोड, ठाणे

मुंबई-ठाण्यासह देशभरात अतिरेकी व त्यांच्याशी संबंधित नेटवर्कची पाळेमुळे शोधण्यास पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांसह दहशतवाद विरोधी पथकाने सुरुवात केली आहे. दिल्ली स्फोटानंतरच्या कारवाई अंतर्गत गुजरात एटीएस पथकाने काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथून डॉ. अहमद मोहियुद्दीन सैय्यद या पस्तीस वर्षीय डॉक्टरास त्याच्या दोन साथीदारांसह अटक केली आहे. या डॉक्टराच्या चौकशीतून विध्वंसक ‘जहरखुरानी’च्या षड्यंत्राचा पर्दाफाश झाला आहे.

अहमद मोहियुद्दीन सैय्यद हा दहशतवादी पाच वर्षे चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परतला होता. याच काळात तो इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत (आईएसकेपी) या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. रसायन व घातक औषधींची माहिती असल्याने दहशतवाद्यांनी सैय्यदवर विषारी पदार्थ वापरून ‘रिसिन’ नामक घातक विषारी पदार्थ बनवण्याची जबाबदारी सोपवली होती. 2013 मध्ये चीनमधून भारतात परतल्यानंतर सैय्यद याने उत्तर प्रदेश राज्यातील काही कट्टरपंथी तरुणांना ऑनलाईन हेरून त्यांचे ब्रेनवॉश केले आणि त्यांना आपल्या कटात सामील करून घेतले. तेव्हा पासून दहशतवाद्यांचा हा विंग रिसिन बनवण्याचा कट आखत होता. याच प्रकरणी उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातून आजाद सुलेमान शेख आणि लखीमपुर खीरी येथून मोहम्मद सुहेल खान या दोघांना देखील जहरखुरानीच्या कटात सामील असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे तिघेही दहशतवादी खतरनाक रिसिन बनवून त्याचा उपयोग सार्वजनिक ठिकाणी बायोलॉजिकल वेपन म्हणून करणार होते, अशी माहिती एटीएसच्या तपासातून समोर आली आहे.

जहरखुरानी म्हणजेच रिसिन रूपी बायोलॉजिकल वेपन म्हणून ओळखले जाते. मंदिर परिसरात प्रसादातून, सार्वजनिक ठिकाणी पाण्यातून अथवा जेवणातून हे विष देऊन विध्वंस घडवण्याचे षड्यंत्र या दहशतवादी संघटना अनेक वर्षांपासून आखत आहेत. जहरखुरानीचे षड्यंत्र यापूर्वी देखील अनेक वेळा भारतीय गुप्तचर व तपास यंत्रणांनी उधळून लावलेले आहे. 2019 साली राज्य एटीएस पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून तलहा ऊर्फ अबूबकर हनिफ पोतरीक (वय 24) नामक एका तरुणास अटक केली होती. हा तरुण विषारी पदार्थ बनवून सार्वजनिक ठिकाणी त्याचा प्रयोग करणार होता. परंतु, त्या पूर्वीच एटीएस पथकाने त्यास अटक करून हा कट उधळून लावला होता. हा तलाह इंटरनेटच्या मदतीने इसिस दहशतवाद्यांच्या संपर्कात आला होता, हे तपासातून समोर आले होते. तो बॅचलर ऑफ मॅनेजमेंट मधून पदवीधर झालेला होता.

तलाह व त्याच्या साथीदारांनी घातपाताचा मोठा कट शिजवला होता. मात्र, त्यापूर्वीच दहशतवादविरोधी पथकास ऑगस्ट 2018 ते जानेवारी 2019 दरम्यान मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद शहरातील गर्दीच्या ठिकाणी घातपात करण्याच कट उमत मोहम्मदीया ग्रुपने रचला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी उमत मोहम्मदीया ग्रुपवर लक्ष ठेवून औरंगाबाद येथील चार आणि मुंब्रातील पाच अशा एकूण नऊ जणांना 22 जानेवारी 2019 रोजी अटक केली आणि हा कट उधळला होता. त्यानंतर आता गुजरात एटीएसच्या तपासातून पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा जहरखुरानी कट समोर आला आहे.

ऑनलाईन नेटवर्क!

पाकिस्तान स्थित आयएसआय व इतर दहशतवादी संघटना भारतातून कट्टरपंथी विचारधारेच्या तरुणांना हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर एटीएसने ठाणे, पुणे, मुंबई, संभाजीनगर येथून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व तरुण दहशतवादी संघटना व एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जुळले होते, असे तपासातून समोर आले आहे. ऑनलाईन अ‍ॅक्टिव्हिटीवर नजर ठेवणारी टेक्नोलॉजी वापरून या घटना रोखण्यावर तपास यंत्रणा सर्वाधिक भर देत आहे. केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांत राज्यातून 32 तर देशभरात दोनशेहून अधिक देशविरोधी हालचाली करणार्‍या संशयितांना एनआयए व इतर तपास यंत्रणांनी ऑनलाईन ट्रॅक करून हेरले व गजाआड केले आहे.

व्हाईट कॉलर विंग!

पाकिस्तानची आयएसआय, जैश-ए-महंमद, इसिस अशा दहशतवादी संघटना डॉक्टर असलेल्यांचा केमिकल बॉम्ब व अत्याधुनिक बॉम्ब बनवण्यासाठी उपयोग केला जातो. इंजिनियर असलेल्या विंगवर पारंपरिक बॉम्ब बनवणे, गुप्त इलेक्ट्रॉनिक गॅजेट बनवणे अशी कामे सोपवली जातात. कट्टरपंथी विचारधारा असलेल्या शिक्षित तरुणांवर नवी भरती करण्याची जबाबदारी सोपवली जाते. व्हाईट कॉलर तरुणांची भरती करून त्यांचा दहशतवादी कारवायात उपयोग केला, तर त्यांच्यावर सहसा कुणी संशय करीत नाही, हा मुख्य मनसुबा अतिरेक्यांचा आहे, अशी बाब भारतीय यंत्रणांच्या तपासातून समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news