

नाशिक : शिक्षक भरतीबाबत परवानगी न घेता जाहिरात प्रसारित करून तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश डावलून शिक्षणसेवकांना बेकायदेशीररीत्या भरती केल्याचा प्रकार सटाणा येथे उघडकीस आला. याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात जिल्हा विधायक कार्यकारी समितीचे अध्यक्ष विजय पंडित पाटील (रा. अथर्व बंगला, सटाणा) व जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन पोपट बच्छाव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2012 मध्ये हा प्रकार घडला होता.
सटाणा येथील दिनेश शिवाजी सोनवणे (43) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी विनापरवानगी १६ फेब्रुवारी 2012 रोजी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. विधायक कार्यकारी समितीने शिक्षक भरतीची परवानगी मिळवण्यासाठी नाशिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे दि. 5 जानेवारी 2012 रोजी अर्ज दिला होता. परवानगीशिवाय 16 फेब्रुवारी रोजी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ही जाहिरात संशयित पाटील व बच्छाव यांनी प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली होती.
संस्थेचे चिटणीस सुकदेव सोनवणे यांनी दि. 19 एप्रिल रोजी भरती बेकायदेशीर असल्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी दि. 30 एप्रिल रोजी ही नियमबाह्य भरती असल्याचा दाखला दिला होता. परंतु, तरीदेखील नियमानुसार भरतीप्रक्रिया झाली नाही. सन 2019 मध्ये माहिती अधिकारात शिक्षणाधिकाऱ्यांची टिपण्णी मागविण्यात आली होती. त्यानुसार सन 2018 मध्ये शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी 47 शिक्षणसेवकांना मान्यता दिल्याचे टिपण्णीत आहे. तसेच बिंदूनामावली तपासणीसंदर्भातही अनेक त्रुटी आहेत.
भरती केलेल्यांपैकी 31 शिक्षणसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, शालार्थ आयडीमध्ये उच्च न्यायालयाच्या याचिकेचा क्रमांक नोंदवून 11 सेवकांची नोंद केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. यासह भरतीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवून तारखांमध्ये फेरफार केला. शिक्षणसेवकांना बेकायदेशीररीत्या भरती करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका फिर्यादीत आहे.
संस्थांतर्गत वादाचा हा प्रकार आहे. हे प्रकरण जुने असून याच्याशी माझा काही संबंध नाही.
नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, नाशिक