

मुलुंड (मुंबई) : मुलुंड (पश्चिम) परिसरात एका १६ वर्षीय मुलाने मर्सिडीज कार बेदरकारपणे चालवल्याने मुलाच्या आईविरुद्ध मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना २७ सप्टेंबर रोजी पहाटे मुलुंड पश्चिमेतील पाच रस्ता आणि एमजी रोडजवळील डंपिंग रोडवर घडली.
मुलुंड पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा पहाटे २.३० च्या सुमारास बेदरकारपणे गाडी चालवताना दिसला. प्राथमिक चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी मुलाची आई उमा राकेश धिंग्रा (४५) हिच्यावर मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक रामदास शेलार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र चौगुले यांना एमजी रोडवर एक काळी मर्सिडीज एस-क्लास (एमएच ०२ बीजी ७०३०) वेगाने येताना दिसली. चौगुले यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालक थांबला नाही. जवळच्या नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अखेर कार अडवली. चौकशी केल्यावर, त्या मुलाने सुरुवातीला १८ वर्षांचा आणि मुलुंड कॉलनीचा रहिवासी असल्याचे सांगितले, परंतु त्याला वैध चालक परवाना सादर करता आला नाही.
तपास सुरू असताना, प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना माहिती दिली की, हा मुलगा धोकादायकपणे गाडी चालवत होता. अल्पवयीन मुलाला गाडीसह ताब्यात घेऊन मुलुंड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अधिक चौकशी केली असता, त्याने त्याच्या वयाबद्दल टाळाटाळ करणारी उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पालकांना बोलावून अधिकृत कागदपत्रे मागितली. त्याची आई उमा राकेश धिंग्रा पोलीस ठाण्यात आली आणि तिने मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड प्रमाणपत्र सादर केले, ज्यावरून तो २० फेब्रुवारी २००९ रोजी जन्मल्याची पुष्टी मिळाली. आधारकार्डवरील नोंदीनुसार तो फक्त १६ वर्षे आणि ७महिन्यांचा होता. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी मोटार वाहन कायद्याच्या कलम १९९ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला, ज्यामध्ये वैध परवान्याशिवाय अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्याची परवानगी दिल्याबद्दल पालक किंवा मालक जबाबदार ठरतो.