

नाशिक : चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या तिघांना गुन्हेशाखा युनिट दोनने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, सात गुन्हे उघडकीस आणले आहेत.
गुन्हेशाखा युनिट दोनचे अधिकारी, अंमलदाराकडून मागील काही दिवसांपासून चोरीच्या दुचाकींचा तसेच संशयितांचा शोध घेतला जात आहे. त्याकरिता घटनास्थळी भेट देवून तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची माहिती काढली. त्यातच गुप्त बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील संशयित आरोपी राजन याने नाशिक शहरामधून दुचाकी चोरून त्या मालेगाव, श्रीरामपूर, शिर्डी भागात विक्री केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार गुन्हेशाखा युनिट दोनचे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी) यांनी पथकाला मार्गदर्शन केले. त्यानुसार उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक उपनिरीक्षक गुलाब सोनार, हवालदार अतुल पाटील, परमेश्वर दराडे, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी आदींच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत दुचाकी खरेदी करणारे संशयित अरविंद महादेव सोनवणे (२४, रा. कालिकानगर, शिर्डी, जि. अहिल्यानगर), जुबेर मुक्तार अख्तर (२०, रा. मालेगाव) आणि वैभव बंडू काळे (२८, रा. ममदापूर, ता. राहता, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. संशयितांकडून एकूण चार लाख ७० हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये पंचवटी पोलिस ठाण्यातील दोन, आडगाव, म्हसरूळ, इंदिरानगर, उपनगर पोलिस ठाणे आणि ठाणे आयुक्तालय हद्दीतून चोरीस गेलेल्या दुचाकीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले.