

पंचवटी (नाशिक) : पेठ रोडवरील फुलेनगर येथे डीजेचे आवाजामुळे 23 वर्षीय युवकाचा रविवार (दि.13) रोजी रात्री मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार किरण सानप करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंचवटीतील पेठ रोड भागात रविवार (दि.13) रोजी मिरवणूक काढण्यात येत असते. तर जागोजागी उभारण्यात आले होते. संपूर्ण पेठ रोडवर परिसरात डीजेवर गाण्याची धूम सुरू होती. या दरम्यान नितीन फकिरा रणशिंगे (वय 23, रा. ओमकार बाबा गल्ली, महात्मा फुले नगर , पेठ रोड, पंचवटी ) यास रविवार(दि.13) रोजी महात्मा फुले नगर येथील पुतळ्याजवळ डिजे चालू असताना आवाजाचा त्रास झाल्याने तोंडातून व कानातून रक्तस्त्राव झाला. त्यास आनंद फकिरा रणशिंगे याने रात्री साडे नऊ वाजता उपचारार्थ शासकीय रुग्णालयात हलविले असता युवकास डॉक्टर वर्मा यांनी तपासून मयत घोषित केले.