

चाकूर (छत्रपती संभाजीनगर) : वडिलांनी घरातील गॅस भरण्यासाठी पैसे दिले परंतु पोलिस भरतीच्या फीससाठी मला पैसे ठेवले नाहीत, म्हणून स्वतःच्या पोटच्या मुलांने जन्मदात्या बापाच्या डोक्यात काठी घालून त्याचा निघृण खून केल्याची घटना चाकूर तालुक्यातील हिंपळनेर येथे मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली. पोलिसांनी त्या मुलाला अटक केले असून या घटनेने लातूर जिल्हा व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील हिंपळनेर येथील अजय देविदास पांचाळ वय २४ वर्षे याने त्याचे वडील देविदास काशीनाथ पांचाळ वय ७० वर्षे यांना मला पोलिस भरतीच्या फीस भरण्याकरिता पैसे न देता तुम्ही गॅस भरून का घेतला ? याचा राग मनात धरून सोमवारी १५ सप्टेंबर रोजी रात्री ते मंगळवार १६ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास वडिलांस हातातील लाकडाने मारून जखमी करून ठार मारले. अशी तक्रार मुलाची आई शारदाबाई देविदास पांचाळ वय ५० वर्षे हिने पोलिसांत दिल्यावरून पोलिसांनी अजय देवीदास पांचाळ वय २४ वर्षे याच्याविरुध्द चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरिक्षक बालाजी भंडे यांनी भेट दिली. दरम्यान न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन नमुने घेतले आहेत. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जी. एन. चामले हे करीत आहेत.