

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्यात क्लेशदायक घटना घडली आहे. माथेफिरूने रविवारी (दि.9) सायंकाळच्या सुमारास एका घरात घुसून दोन शाळकरी अल्पवयीन मुलांचा विनयभंग केला. घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर तुम्हा दोघींना शाळेमधून उचलून नेईन, अशीही त्या बदमाशाने धमकी दिली.
पालकांनी धाडस करून मुलींसह पोलिस ठाण्यात धाव घेऊन माथेफिरु विरोधात फिर्याद दाखल केली आहे. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तालुका पोलिसांनी सोमवारी (दि.10) मध्यरात्री गुन्हा नोंदवून फरार बदमाशाचा शोध सुरू केला आहे.
विनयभंग करणारा बदमाश कल्याण तालुक्यातील घोटसई गावातील असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. एक पीडित मुलगी 14 वर्षांची असून दुसरी 12 वर्षांची आहे. पीडितेचे कुटुंब मोलमजुरी करून उपजीविका करते.
या संदर्भात 14 वर्षीय पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी बाल लैंगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत मुलगी राहत असलेल्या घराच्या परिसरात चायनिजचे दुकान आहे. या दुकानात मालकाच्या भावाचे वारंवार येणे-जाणे असते. त्यामुळे तक्रारदार मुलीची त्याच्याशी तोंड ओळख होती. गेल्या तीन दिवसांपासून शाळेत जात असताना चायनिज दुकानाच्या मालकाचा भाऊ पाठलाग करत असल्याचे मुलीला जाणवत होते.
रविवारी (दि.9) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चायनिज दुकान मालकाचा भाऊ पिडीत मुलीच्या घरात घुसला. तू घरात का आलास ? असा मुलीने जाब विचारला. तू मला खूप आवडतेस, असे बोलून त्याने मुलीचा हात पकडला. मुलीने त्याचा झटकला. त्याला घरातून निघून जाण्यास सांगितले. हा प्रकार सुरू असतानाच पिडीत मुलीची 12 वर्षीय मावस बहिण अचानक घरात आली. घरात काय सुरू आहे, असा जाब विचारला असता त्याने मावस बहिणीच्या खांद्यावर हात टाकून तू सुध्दा मला खूप आवडतेस, असे बोलून हात पकडून स्वयंपाकघरापर्यंत ओढत नेले. घरात घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर तुम्हाला तुमच्या शाळेमधून उचलून घेऊन जाईन, अशी या दोघींना धमकी दिली. त्यानंतर तो घरातील सोफ्यावर जबरदस्तीने झोपला. तेथे त्याने त्याचे दोन्ही मोबाईल फोडून ते उचलून घेऊन निघून गेला.
या घडल्या प्रकाराने पिडीत दोन्ही बहिणी प्रचंड भयभीत झाल्या होत्या. पिडीतेची आई रात्री मजुरी करून घरी आली. मुलींनी घरात घडलेला सारा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने दोन्ही मुलींसह तालुका पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी दोन्ही मुलींना धीर दिला. त्यानंतर मोठ्या मुलीच्या फिर्यादीवरून तातडीने गुन्हा दाखल करून घेतला. आरोपी अद्याप हाती लागला नसून पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव आणि त्यांचे सहकारी त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.