

डोंबिवली (ठाणे): कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगरमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास भयकंप घडणारी रक्तरंजित घटना घडली. ओल्या पार्टीसाठी पैसै दिले नाही म्हणून शेजाऱ्यांशी वाद घातला. इतकेच नव्हे तर पार्टीसाठी पैसै मागणाऱ्या संतापलेल्या बाप-लेकाने आपल्या साथीदारांसह दारूसाठी पैसे देण्यास इन्कार करणाऱ्या शेजाऱ्यासह त्याच्या पत्नीसह 19 वर्षीय मुलीला लाकडी दांडक्याच्या साह्याने झोडपून काढले.
पित्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेली 19 वर्षीय तरूणी जीवघेण्या हल्ल्यात जागीच ठार झाली. सानिया सय्यद असे मृत तरूणीचे नाव आहे. या घटनेनंतर महात्मा फुले चौक पोलिसांनी गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख व त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्यांचे साथीदार शोएब शेख, अजिज शेख व शाहिद शेख या पाच खूनी मारेकऱ्यांच्या टोळक्याला अवघ्या काही तासांतच बेड्या ठोकल्या.
कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद हे त्यांच्या पत्नी व मुलीसह राहतात. निसार सय्यद हे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. दिवसभर भाजी विक्री करून थकून-भागून घरी आलेले निसार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवण करत बसले होते. इतक्यात त्याच परिसरात राहणारा गुलाम शेख अचानक घरात घुसला. त्याने निसार यांच्याकडे दारूची पार्टी करण्यासाठी पैसे मागितले. अरे मी भाजी विकून कसाबसा प्रपंच चालवतो. माझे इतके उत्पन्नही नाही. मी का म्हणून तुला दारूसाठी पैसै देऊ ? असा सवाल करत निसार यांनी गुलामला पैसे देण्यास इन्कार केला. यावरून दोघांत बिनसले. निसार आणि गुलाम यांच्यात वादाचा भडका उडाला. या वादातून गुलामचा मुलगा अब्दुल शेख याने त्याचा मित्र शोएब शेख, अजित शेख व शाहीर शेख या सगळ्यांनी मिळून घरात घुसून निसार यांना बेदम मारहाण केली.
निसार यांची पत्नी झुलेखा व मुलगी सानिया या दोघी हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविण्याकरिता धावल्या. या दोघी माय-लेकीला देखिल टोळक्याने सुरूवातीला धक्काबुक्की केली. याच दरम्यान मस्तकात सैतान संचारलेल्या अब्दुलने निसार यांची मुलगी सानियावर सोबत आणलेल्या लाकडी दांडक्याने हल्ला केला. घाव वर्मी बसल्याने सानियाचा रक्ताच्या थारोळ्यात तडफडून जागीच मृत्यू झाला. हे पाहून हल्लेखोर पाचही खून्यांनी तेथून पळ काढला. या घटनेची खबर कळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर सानियाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला. या प्रकरणी हल्ल्यात जखमी झालेले सानियाच्या खुनाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तिचे वडील निसार सय्यद यांच्या जबानीवरून पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. याच दरम्यान पोलिसांनी तपास चक्रांना वेग देऊन गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्याचे सहकारी शोएब शेख, अजिज शेख, शाहिद शेख या पाच जणांना बेड्या ठोकल्या. दरम्यान या घटनेनंतर इंदिरानगर परिसरात एकच खळबळ माजली आहे.