

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील कश्यपी धरणात सातपूर परिसरातील इंजिनिअर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तुषार संजय तायडे (27, रा. अशोकनगर, सातपूर) असे या तरुणाचे नाव आहे. तो दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची फिर्याद सातपूर ठाण्यात देण्यात आलेली आहे.
मंगळवारी (दि. 22) सकाळी धरणात मृतदेह तरंगताना आढळून आल्याने याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. धरणाच्या काठावर तरुणाची दुचाकी आढळून आल्याने मृतदेहाची ओळख पटवणे शक्य झाले. दरम्यान, हरसूल येथे शवविच्छेदनासाठी वैद्यकीय अधिकारीच नसल्याने माजी नगराध्यक्ष प्रशांत तुंगार यांच्यासह मृताच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त करत नाशिकला मृतदेह पाठविणार नसल्याची भूमिका घेतली. अखेर दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. तायडे हा अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तसेच त्याने एमबीएअभ्यासक्रमालाही प्रवेश घेतला होता. त्याने आत्महत्या केली की घातपात याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.