

मुंबई : पीटर मुखर्जी यांची मुले राहुल आणि रबिन यांनी आपल्या आईच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचे वडिलोपार्जित दागिने आणि 7 कोटी रुपये रोख रक्कम चोरली. इंद्राणी मुखर्जीला या प्रकरणात अडकवण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू होता, आईकडे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे उरले नाहीत, असा दावा इंद्राणी मुखर्जी आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना यांची मुलगी विधी मुखर्जी हिने मंगळवारी (दि.2) विशेष सीबीआय न्यायाधीश जे. पी. दरेकर यांच्यासमोर साक्ष देताना केला.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी प्रमुख साक्षीदार विधि मुखर्जी हिने तपास यंत्रणांसमोर कोणताही जबाब नोंदविण्यास नकार दिला. मंगळवारी सीबीआयच्या आरोपपत्रात तिच्या जबाबात जोडलेली कागदपत्रे बनावट असल्याचे सांगून, तिने तपास यंत्रणांसमोर कोणताही जबाब नोंदविण्यास नकार दिला.
गुन्हा घडला त्यावेळी विधी मुखर्जी अल्पवयीन होती. तिने दावा केला की, तिच्या आईच्या अटकेनंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता आणि अजूनही तिच्या मनावर याच्या भावनिक जखमा आहेत. तिने असाही युक्तिवाद केला की कोणीतरी तिचे खरे पालक, इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांना या प्रकरणात खोटेपणे गोवण्याचा प्रयत्न करत असावे. शीना बोराने स्वतःची ओळख इंद्राणी मुखर्जीची बहीण म्हणून करून दिली होती, असेही तिने सांगितले.
सुरुवातीला शीना बोरा आणि इंद्राणी यांच्यात खूप चांगले संबंध होते. पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल मुंबईतील वरळी येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये येऊ लागल्यानंतर त्यांच्यात वाद सुरु झाले असे तिने सांगितले. विधी मुखर्जीच्या म्हणण्यानुसार, राहुल ड्रग्जचे सेवन करत असल्याचे कुटुंबाला समजले आणि बोराही त्यात सामील झाली तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली.
इंद्राणी मुखर्जीसह पती खाना आणि पीटर यांना अटक
शिना बोरा हिची, तिची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा ड्रायव्हर श्यामवर राय, जो नंतर या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनला आणि खन्ना यांनी एप्रिल 2012 मध्ये कारमध्ये गळा दाबून हत्या केली होती. तिचा मृतदेह जाळून लगतच्या रायगड जिल्ह्यातील जंगलात फेकून देण्यात आला होता. एका दुसर्या प्रकरणात अटक झाल्यानंतर रायने गुन्ह्याबद्दल माहिती दिल्यानंतर 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आली. या खुलाशानंतर पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी आणि तिचे पूर्वाश्रमीचे पती खाना आणि पीटर यांना अटक केली.