

नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात मोबाइलधारकांनी चार जणांची ५५ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांना अज्ञात इसमांनी व्ही - १२ मनी माय टाटा कॅपिटल या नावाने बनविलेल्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. फिर्यादीस वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्स ॲप कॉलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना काही लिंक पाठविल्या. या लिंकमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फिर्यादी यांची ११ लाख ४६ हजार ५९२ रुपये व त्याच प्रकारामध्ये इतर तीन साथीदारांची एकुण ४३ लाख ९५ हजार १३६ रुपये अशी मिळून चौघांकडून एकुण ५५ लाख ४१ हजार ७२८ रुपयांची रक्कम स्वीकारून अज्ञात मोबाइलधारक आरोपींनी आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार २८ एप्रिल ते १० जून या कालावधीत घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्हॉट्स ॲप ग्रुपधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.