Sexual Assault | कोलकाता, बदलापूर...रोज नवे नाव! हे थांबणार कधी?

देशात दर तासाला ५१ गुन्हे
Crime Diary
कधी थांबणार हे ? File Photo
Published on
Updated on
धनंजय लांबे, छ. संभाजीनगर

कोलकाता, बदलापूर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव... यादी संपतच नाही. दररोज नवे नाव, महिला-मुलींना छळण्याचा नवा प्रकार. जनक्षोभ, मोर्चे, निदर्शने. मुलींच्या पालकांना, कुटुंबांना पडलेला एकच प्रश्न, हे थांबणार कधी? परिस्थिती अशी की, एकटी-दुकटीने घराबाहेर पडूच नये. नाक्यानाक्यावर वखवखलेल्या नजरा. डोळे वर करून पाहिलं की पाठलाग होणार म्हणून पायाच्या अंगठ्याकडेच पाहून हे नाके ओलांडण्याची नामुष्की. असे एकही ठिकाण उरलेले नाही, जिथे त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. रुग्णालयापासून कार्यालयापर्यंत, शाळेपासून रेल्वे-बस-कारपर्यंत. सुसंस्कृत म्हणविणार्‍या महाराष्ट्रातही परिस्थिती बिघडली आहे.

काहीही कर पण; मुलीचे शाप घेऊ नकोस, हा संस्कारच संपला आणि घराबाहेर पडणार्‍या मुलींना सहज छळता येते, हा समज रूढ होत गेला. भांडण-तंटे नको म्हणून अशा प्रकारांकडे लोक दुर्लक्ष करू लागल्यामुळे टवाळखोरांची हिंमत वाढत गेली. त्यामुळे 2023 मध्ये महाराष्ट्रात बलात्काराच्या तब्बल 7,521 घटना नोंदविल्या गेल्या. 2020-21 मध्ये त्या 5,954 होत्या, असा ताज्या आर्थिक सर्वेक्षणात दिला आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही दर लाख महिलांमागे 66 वरून (2021-2022) 76 एवढी (2022-23) वाढ झाली आहे. विनयभंग आणि अवमानाच्या 5,209 घटना घडल्या; तर लैंगिक अत्याचारांच्या 2,946 घटना 2022 मध्ये घडल्या. यापैकी 46 घटना कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक छळाच्या होत्या.

एकट्या मुंबईत गेल्या जानेवारीत लैंगिक छळाच्या 184 घटना घडल्या. त्यांपैकी 152 घटनांचा पोलिस छडा लावू शकले. म्हणजेच दिवसाला अशा सहा घटना महानगरात नोंदविल्या गेल्या. अर्थात, कारवाईचा दरही 80 ते 95 टक्क्यांपर्यंत म्हणजे समाधानकारक आहे. जानेवारीत बलात्काराच्या 60 घटना मुंबईत नोंदविल्या गेल्या, त्यांपैकी 47 घटनांचा छडा लावण्यात आला. हे प्रमाण 78 टक्के आहे. येथे दररोज महिलांविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांची संख्या जानेवारीत 15 होती. एकूण 477 गुन्हे या महिन्यात नोंदविले गेले. त्यांपैकी 365 गुन्ह्यांची उकल (77 टक्के) पोलिसांनी केली. 2023 मध्ये 5,913 गुन्हे नोंदविले गेले, त्यापैकी 5,570 गुन्ह्यांची (94 टक्के) उकल झाली. 2022 मध्ये गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण राज्यात 81 टक्के होते.

देशात तासाला 51 गुन्हे

महिलांविरुद्ध गुन्ह्यांची संख्या 2022 मध्ये देशात तब्बल 4 लाख 45,256 होती. म्हणजेच दर तासाला असे 51 गुन्हे घडले, असे नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्यूरोच्या अहवालात म्हटले आहे.

Sexual Assault : कारणे काय?

महिलांविषयी वातावरण गढूळ होण्यास आणि गुन्हेगारी वाढण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. तरुणांमध्ये वाढत चाललेली बेरोजगारी, आपल्या आणि इतरांच्या कुटुंबांशी तुटत चाललेला त्यांचा ‘कनेक्ट’, समाज माध्यमांचा पगडा, छंदांचा अभाव ही काही प्रमुख कारणे आहेत, असे मानसोपचार तज्ज्ञ मानतात. छत्रपती संभाजीनगरचे डॉ. संदीप शिसोदे म्हणतात, काहीतरी वेगळे धाडस करण्याची वृत्ती महिलांविरुद्ध गुन्हे करण्यास प्रवृत्त करते.

शिवाय माध्यमांमुळे तरुणांच्या संवेदनांची धारही बोथट झाली आहे. ते स्वत:च्याच भावनांचा विचार करताना दिसत नाहीत, त्यामुळे इतरांच्या भावनांची कदर त्यांच्याकडून कधीच केली जात नाही. सुरुवातीला ही मुले, तरुण काही छोट्या चुका करतात. कुटुंबीयांनी, समाजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तर त्यांचे धाडस वाढत जाते आणि मोठा गुन्हा त्यांच्याकडून घडून जातो. मुलगा किंवा तरुणाच्या वागण्यातील नकारात्मक बदल लक्षात घेऊन त्यात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न करावे लागतील; अन्यथा मुली, महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच जाईल, असे डॉ. शिसोदे यांचे मत आहे.

पोक्सो गुन्ह्यांच्या सुनावणीत विलंब

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) कायद्यांतर्गत आणि बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये दाखल खटल्यांची जलद सुनावणी व्हावी, यासाठी केंद्र सरकारने देशभरात 764 फास्ट ट्रॅक न्यायालये सुरू केली आहेत. यातील 411 न्यायालये फक्त पोक्सो न्यायालये आहेत. ही न्यायालये दरवर्षी तब्बल 1.4 लाख खटले निकाली काढत आहेत, तरीही 31 जानेवारी 2023 च्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात सर्वाधिक 67 हजार 153 खटले, तर त्याखालोखाल महाराष्ट्रात 33 हजार 73 खटले प्रलंबित आहेत.

उपाय

आक्रमक विचारांना खेळ, व्यायाम, पुस्तक वाचन, कला अशा माध्यमांतून वाट करून देणे; मी माझ्यासाठी आणि लोकांसाठी चांगले काम करून दाखवेन हा संस्कार शाळा आणि कुटुंबातून देणे, थोर पुरुषांच्या वाटेने चालण्यास प्रोत्साहन देणे आणि सर्वात आधी यू-ट्यूबचा वापर थांबविणे, हे या गढूळ वातावरणाला सुधारण्याचे उपाय आहेत, असेही डॉ. शिसोदे सांगतात.

Administrator

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news