

अनेकवेळा पोलिस अधिकारी गुन्हेगारांचे अंतरंग ओळखण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करतात. गुप्तहेर मंडळी तर यात विशेष प्रावीण्य मिळवून असतात. देहबोलीच्या अभ्यासामुळे एका जागतिक कट कारस्थानाचा कसा भांडाफोड झाला, त्याची ही रोमहर्षक कहाणी...
सुनील कदम
अमेरिकन सैन्य दलात क्लाईड ली कामराड नावाचा एक सैनिक होता. रॉड्रीक जेम्स रॅमसे नावाचा त्याचा सैन्य दलातीलच एक साथीदारही होता. जगभरातील अमेरिकेच्या वेगवेगळ्या सैनिकी तळांवर त्यांची नेमणूक व्हायची. 1988 साली जर्मनीतील सैन्य तळावर नेमणुकीस असताना जर्मन पोलिसांनी क्लाईड याला अटक केली. जर्मनीची आण्विक आणि सामरिक गुपिते शत्रू राष्ट्रांना पुरविल्याचा त्याच्यावर आरोप होता.
क्लाईडच्या अटकेनंतर काही दिवसांनी रॉड्रीक याची नेमणूक अमेरिकेतील प्लोरिडा प्रांतातील सैनिकी तळावर झाली. रॉड्रीक हा क्लाईडचा साथीदार असल्यामुळे अमेरिकन गुप्तहेर संस्था एफबीआयला रॉड्रीक याचाही क्लाईडच्या कटात सहभाग असावा असा संशय होता. पण कोणतेही सकृतदर्शनी पुरावे मात्र नव्हते. तरीदेखील एफबीआयने आपल्या जो नवारो नावाच्या एका तरुण अधिकार्याला रॉड्रीकची चौकशी करण्याचे आदेश दिले.
जो नवारो हा एकेदिवशी रॉड्रीक उपस्थित असलेल्या सैन्य तळावर दाखल झाला. त्यावेळी रॉड्रीक हा निवांतपणे सिगारेटचे झुरके घेत उभा होता. सुरुवातीला औपचारिक गप्पा मारल्यानंतर नवारोने मूळ मुद्द्याला हात घातला आणि रॉड्रीक याला क्लाईडबद्दल काही प्रश्न विचारले. पण याबाबतीत आपणाला काहीच माहिती नसल्याचा रॉड्रीकने आव आणला. पण नवारोच्या चाणाक्ष नजरेने एक बाब हेरली की, आपण क्लाईडचे नाव घेतले की रॉड्रीकच्या हातातील सिगारेट थरथरू लागते. देहबोलीचा सखोल अभ्यास असलेल्या नवारोने जाणले की, रॉड्रीक खोटे बोलत आहे. त्याने रॉड्रीक याच्या देहबोलीबाबतचा आपला सविस्तर अहवाल एफबीआयला सादर केला आणि त्यामध्ये रॉड्रीक खोटे बोलत असल्याचे ठामपणे नमूद केले.
एफबीआयचा आपला तरुण अधिकारी नवारो याच्यावर आणि त्याच्या कार्यपद्धतीवर ठाम विश्वास होता. त्यामुळे एफबीआयने रॉड्रीक आणि क्लाईड या जोडगोळीचा सखोल तपास सुरू केला. जवळपास दहा वर्षे हा तपास सुरू होता. या तपासादरम्यान ज्या ज्या देशात नेमणुकीसाठी जातील, त्या त्या देशातील आण्विक आणि सामरिक गुपिते रॉड्रीक आणि क्लाईड या जोडगोळीने मिळविल्याचे स्पष्ट झाले. एवढच नव्हे तर ती गुपिते त्या त्या देशांच्या शत्रू राष्ट्रांना विकल्याचेही उघडकीस आले. त्यामुळे नंतर या प्रकरणाच्या तपासात पेंटागॉन (अमेरिका), सीआयए (अमेरिका), एमआय-6 (इंग्लंड), बीएनडी (जर्मनी), आयएच (हंगेरी) ह्यांनी त्यात रस घेतला आणि रॉड्रीक आणि क्लाईड या जोडगोळीने केलेले भयावह कारनामे चव्हाट्यावर आले.
त्यानंतर सावध झालेल्या त्या त्या देशातील सैन्य दलाने आणि गुप्तचर यंत्रणांनी आपापल्या आण्विक आणि सामरिक कोडवर्ड प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करून टाकले. अन्यथा ज्या ज्या देशांची गुपिते रॉड्रीक आणि क्लाईड यांनी विकली होती, ते सगळेच देश युद्धाच्या खाईत लोटण्याचा फार मोठा धोका होता. एकाचवेळी जगभरातील अनेक देशांमध्दे युद्ध भडकण्याची शक्यता होती. पण नवारो या चाणाक्ष एफबीआय अधिकार्यामुळे रॉड्रीक आणि क्लाईड या जोडगोळीचे कारस्थान चव्हाट्यावर आले आणि जग युद्धाच्या खाईत लोटण्यापासून बचावले. यावरून गुन्हेगाराच्या अंतर्मनाचा ठाव घेण्यासाठी त्याच्या देहबोलीचा अभ्यास किती महत्त्वाचा ठरतो, हे समजून येण्यास हरकत नाही.
पंचवीस वर्षांच्या एफबीआय सेवेनंतर जो नवारो हे 2003 साली सेवानिवृत्त झाले. पण आजही अनेक पोलिस आणि गुप्तचर अधिकार्यांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. हॉलीवूड अभिनेता जॉर्ज क्लुनी याने या विषयावर चित्रपट बनवायचे अधिकार सुरक्षित केले आहेत. त्यामुळे लवकरच या विषयावरील हॉलीवूड चित्रपट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.