Sanju Deshmukh Murder Case | खुनाचा बदला!

Murder Case
Sanju Deshmukh Murder Case | खुनाचा बदला!Pudhari
Published on
Updated on

अशोक मोराळे, पुणे

वडिलांचा खून झाला तेव्हा मंथन अवघ्या दीड वर्षाचा होता. काळ पुढे सरकत गेला. दीड वर्षाचा मंथन पंचवीस वर्षांचा झाला. वडिलांचा खुनी देशमुखनेच मंथनला एका खून प्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर ‘शांत राहा, नाही तर तुझाही तुझ्या वडिलांसारखा खून करीन’, अशी धमकी दिली. त्यातून मग घडले संजू देशमुखच्या खुनाचे नाट्य!

आपल्या वडिलांचा खून करून हा मलाही धमकावतो आहे, यामुळे मंथन चिडून होता. वडिलांच्या खुनाचा सूड त्याला घ्यायचा होताच. त्यातून त्याने देशमुखला कायमचे संपवायचे ठरवले. दोनवेळा त्याने देशमुखसाठी ट्रॅपदेखील लावला; मात्र तो वाचला. शेवटी त्याने आपला काका संदीप कोरी याच्या साथीने अखेरचा डाव टाकला. त्याला साथ दिली ती सनी ऊर्फ भारत सोमनाथ सोनावणे याने.

सनी देशमुखच्या जवळचा; मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांचे बिनसले होते. सनीने देशमुखच्या प्रत्येक हालचालीची माहिती मंथनला दिली. त्या बदल्यात मंथन त्याला पैसे देणार होता. दुसरीकडे कोरी आणि देशमुखही चांगल्या ओळखीचे; परंतु कोरी हा मंथनचा नातेवाईक आहे, हे देशमुखला माहिती नव्हते. तेथेच तो फसला आणि मंथनच्या लावलेल्या तिसऱ्या ट्रॅपमध्ये अडकला. वाढदिवसाच्या पार्टीचा बहाणा करून कोरी देशमुखला ११ जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पुण्यातून आपल्यासोबत रिक्षाने घेऊन आला. त्याचवेळी मंथन आणि त्याचे इतर साथीदार दुचाकीवरून रिक्षाच्या पाठोपाठ पाठलाग करत होते. शिवाय सनी हा देशमुखची माहिती मंथनाला देतच होता. रिक्षा शिंदेवाडी गावच्या हद्दीत जुना कात्रज बोगदा परिसरात आली आणि मंथन आणि इतर आरोपींनी देशमुखला घेरले.

देशमुखच्या समोर आता मृत्यू उभा होता. त्याने हालचाल करण्याअगोदरच मंथनने त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. तो खाली पडून पळ काढू लागला. तेवढ्यात आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. जोपर्यंत तो निपचित पडत नाही, तोपर्यंत आरोपी त्याच्यावर वार करतच होते. अखेर तो निपचित पडला. त्यानंतर तेथून सर्वांनी पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास करून मुख्य आरोपीसह चौघांना बेड्या ठोकल्या. यातील सनी हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (उत्तरार्ध)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news