Salim Dola arrest | दाऊदचा ‘ड्रगिस्ट’ डोळा- सलीम डोला..!

डोलाच्या अटकेमुळे दाऊदच्या ड्रग साम्राज्याला हादरा
Salim Dola arrest |
Salim Dola arrest | दाऊदचा ‘ड्रगिस्ट’ डोळा- सलीम डोला..!
Published on
Updated on

भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या अथक प्रयत्नामुळे कुख्यात देशद्रोही दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा ‘ड्रगिस्ट डोळा’ सलीम डोला हा इस्तंबूल पोलिसांच्या कचाट्यात सापडला. सलीम डोला याला लवकरच भारताच्या हवाली केले जाणार आहे. डोला याला अटक झाल्यामुळे दाऊदच्या जगभरातील ड्रग साम्राज्याला फार मोठा म्हणजे हजारो कोटी रुपयांचा हादरा बसला आहे.

सलीम डोला हा एक कुख्यात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर म्हणून ड्रग विश्वात ओळखला जातो; पण ते दाऊदचं एक प्यादं आहे. सलीम डोला हा दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू मानला जातो. दाऊदच्या अमली पदार्थांच्या जागतिक व्यापारात आणि आर्थिक बाबतीत तो महत्त्वाची भूमिका बजावत होता. दोन दिवसांपूर्वी 26 एप्रिल रोजी सलीम डोलाला तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे अटक करण्यात आली. भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलिस गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या मागावर होते.

सलीम डोला हा मूळचा मुंबईचा रहिवासी असून त्याचे बालपण भायखळा परिसरात गेले. त्याने आपल्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवात दाऊदच्या टोळीतून केली आणि नंतर तो अमली पदार्थांच्या तस्करीकडे वळला. डोला हा दुबईतून भारतात चालणार्‍या अमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार असल्याचे मानले जाते. दक्षिण मुंबई आणि डोंगरी परिसरात त्याचे मोठे जाळे सक्रिय होते. दाऊदचे ड्रग नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय आणि अमली पदार्थ नियंत्रण कक्ष यांसारख्या यंत्रणांनी डोलाच्या नेटवर्कवर वेळोवेळी छापेमारी केली होती; मात्र डोला हा हाताला लागत नव्हता. इस्तंबूल पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला आता तुर्कीहून युएई मार्गे भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news