

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे देशातील आणि राज्यातील बांगला देशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बांगला देशी घुसखोरांची ही भुतावळ इथे आपला नंगानाच सुरू करण्यापूर्वीच त्यांची नांगी ठेचण्याची गरज आहे, या गोष्टीचा नव्याने प्रत्यय आलेला आहे...
आरोपी कितीही हुशार असला तरी एखादी चूक करतो किंवा पुरावा सोडतो म्हणतात ते उगाच नाही. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणार्या हल्लेखोराच्या बाबतीत तेच घडले. शनिवारी मध्यरात्री हल्लेखोराने काही वेळेपुरता आपला मोबाईल सुरू केला आणि त्याचे नेटवर्क शोधण्यात पोलिसांना यश आले. लोकेशन मिळाल्यानंतर वेगाने हालचाली करीत पोलिसांनी ठाण्यातील घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागातील कांदळवन परिसरात लपून बसलेल्या शरीफुल इस्लाम या हल्लेखोरावर तब्बल 72 तासांनी झडप घातली.
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या हल्लेखोराने सैफ अलीवर बुधवारी मध्यरात्री हल्ला केला. चित्रपटामंध्ये हाणामारी करत अनेक गुंडांना लोळवणार्या सैफवर एकट्या हल्लेखाराने चाकूचे सहा वार केल्याने सुरुवातीला सर्वांच्यांच भुवया उंचावल्या. उंच आणि बलदंड शरीरयष्टी असलेल्या सैफने हल्लेखोराला घरातील इतर सदस्यांच्या मदतीने पकडून का ठेवले नाही, असाही प्रश्न अनेकांना पडला. पण, पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी बांगला देशातील कुस्तीपटू आहे. त्याने जिल्हा तसेच राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळली आहे. त्यामुळेच तो सैफ अली खानवर हल्ला करण्यात यशस्वी झाला आणि पळून गेला.
सैफवरील हल्ल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. हल्लेखोराच्या चेहर्याशी मिळत्याजुळत्या चेहर्याच्या अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. पण, तरीही काही हाती लागत नसल्याने पोलिसांची झोप उडाली होती. हल्लेखोराला शोधण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले; मात्र सलग तीन दिवस तो पोलिसांना गुंगारा देत राहिला. त्याच्या मागावर असलेले शंभरहून अधिक पोलिस हतबल झाले होते.
पोलिसांच्या तपासानुसार सैफच्या इमारतीतून बाहेर पडल्यानंतर हल्लेखोर 16 जानेवारीला सकाळी 7 वाजेपर्यंत वांद्रे पश्चिमेला असणार्या पटवर्धन गार्डन येथे झोपला होता. त्यानंतर त्याने ट्रेन पकडली व वरळीला आला. वरळीतील एका हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी तो यापूर्वी कामाला होता, त्या ठिकाणी सकाळी त्याने नाष्टा केला. तिथे त्याने ऑनलाईन पैसे दिले. तिथेच तो फसला. पोलिसांना त्याचा नंबर ट्रेस झाला. नाष्टा केल्यानंतर तिथून हल्लेखोर दादरला आला, दादरहून ठाण्याला गेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी तो ठाण्यातून बांगला देशला पळून जाण्याच्या तयारीत होता.
मुंबई पोलिसांना मिळालेल्या मोबाईल नंबरच्या आधारे, आरोपी ठाण्यातील एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुंबई पोलिसांची एक टीम कासारवडवली येथील पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आणि आरोपी ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता, त्या व्यक्तीला शोधण्यास मदत घेतली. ठाणे पोलिसांनी तातडीने ब्राम्हण सोसायटी जवळील अभिषेक हेगडे या 19 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. अभिषेक आणि आरोपी यांच्यामध्ये गेले काही दिवस फोनवरून संपर्क होता. त्याच आधारे अभिषेकची चौकशी केली असता त्याने कासारवडवली येथील लेबर कॅम्पचे लोकेशन दिले. सोबत मोबाईल टॉवरचे लोकेशन देखील याच ठिकाणचे दाखवले होते. त्यामुळे ठाणे पोलिस आणि मुंबई पोलिसांनी मिळून शनिवारी रात्री उशिरा या परिसरात कोंबिंग ऑपरेशन केले.
सुरुवातीला ठाण्यातील घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात असलेल्या एका कामगारांच्या छावणीमध्ये हल्लेखोर लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबई आणि ठाण्यातील कासारवडवली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु छावणीमध्ये तो आढळून आला नाही. तब्बल नऊ तास पोलिसांची नऊ पथके हल्लेखोराचा हिरानंदानी परिसरातील खाडीकिनारी शोध घेत होती.
हल्लेखोराने आपला मोबाईल सुरू केला आणि त्याचे नेटवर्क कांदळवन परिसरात असल्याचे पोलिसांना कळले. मग मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीने हल्लेखोराचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. पक्के लोकेशन मिळाल्यानंतर वेगाने हालचाली करीत पोलिसांनी आरोपीवर झडप घालून त्याला अटक केली. पोलिस चौकशीत अटक केलेल्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानेच सैफ अली खानवर चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याची कबुली दिली. सध्या तो वांद्रे पोलिसांच्या कस्टडीत आहे.
मात्र या सगळ्या घटना क्रमानंतर एक प्रश्न मागे उरतोच, तो म्हणजे मुंबई परिसरात अजून असे किती ‘शरीफुल इस्लाम’ दडून बसले आहेत? कारण मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हजारो बांगलादेशी गेल्या कित्येक वर्षांपासून आपली ओळख लपवून बेकायदेशीररित्या राहात आहेत. यातील बर्याच लोकांचे पाकिस्तानी आणि बांगलादेशी अतिरेक्यांशी संबंध असल्याची बाबही अनेकवेळा चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे या घुसखोरांचा आता कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे; अन्यथा ही बंगाली भूतावळ इथे नंगानाच केल्याशिवाय राहणार नाही.
भारतात गेल्या काही वर्षांत घुसखोरी केलेल्या बांगला देशी घुसखोरांची नेमकी संख्या शासकीय यंत्रणांकडे उपलब्ध नसली तरी हा आकडा किमान 5 ते 6 कोटी असावा, असा जाणकारांचा अंदाज आहे. कारण पश्चिम बंगाल आणि आसामसह पूर्वोत्तर राज्यामध्येच त्यांची संख्या 2 ते 3 कोटींच्या घरात आहे; मात्र देशभरातील बांगला देशी घुसखोरांचा विचार करता हा आकडा किमान 5 ते 6 कोटी निश्चितच असावा. अशांचा शोध घेवून त्यांना बांगलादेशात हाकलण्याची देशव्यापी मोहीम शासनाने सुरू करण्याची गरज आहे.
पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांमध्ये बांगला देशी घुसखोरांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केल्यामुळे सीमावर्ती भागातील शेकडो हिंदूबहूल गावे आता मुस्लिमबहूल झाली आहेत. शिवाय यापैकी अनेक लोकांचे बांगला देशातील ‘हुजी’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचेही स्पष्ट झाले आहे. देशाच्या विविध भागांत घुसखोरी केलेले बहुतांश बांगला देशी हे अनैतिक व्यवसायांमध्ये गुतल्याचे दिसतात. वेश्या व्यवसायात तर बांगला देशी युवतींचीच चलती आहे. शिवाय देशामध्ये चालणार्या अंमली पदार्थांच्या व्यवसायात बांगला देशी घुसखोरांचा वाटा फार मोठा आहे. त्यामुळे कठोरातील कठोर ऑपरेशन करून बांगला देशी घुसखोरीची कीड मुळापासून उपटण्याची आवश्यकता आहे.