Crime News | दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रावर संशय का? 'व्हाईट कॉलर टेरर'ची पाळेमुळे उघड!

Crime News
Crime News | दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रावर संशय का? 'व्हाईट कॉलर टेरर'ची पाळेमुळे उघड!
Published on
Updated on

सुनील कदम

10 नोव्हेंबरला दिल्लीतील मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तपास यंत्रणांच्या संशयित नजरा सर्वात आधी कुठे वळल्या, तर त्या महाराष्ट्राकडे! कारण, गेल्या काही वर्षांत जगभरातील झाडून सगळ्या धर्मांध आणि अतिरेकी संघटनांची काही ना काही पाळेमुळे ही महाराष्ट्रात असल्याचे अनेक घटनांमधून आढळून आले आहे. दिल्ली स्फोटाशी महाराष्ट्राचा अद्याप तरी थेट संबंध आढळून आला नसला, तरी इथे रुजत चाललेले ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’ विचारात घेऊन सुरक्षा यंत्रणांसह सर्वांनीच सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे, एवढे मात्र निश्चित...

देशात कुठेही काही घातपाती घटना, अतिरेकी कारवाया किंवा बॉम्बस्फोटासारखे प्रकार घडले की, देशात सर्वात आधी महाराष्ट्राला आणि त्यातल्या त्यात मुंबईला ‘रेड अलर्ट’ दिला जातो. याचे कारण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून चव्हाट्यावर आलेल्या देशविघातक कारवाया विचारात घेता इथेही मोठ्या प्रमाणात जगभरातील अतिरेकी संघटनांचे नेटवर्क कार्यरत असलेले दिसते. जवळपास 30 वर्षांपूर्वी उदयाला आलेल्या दिनदार-ए-अंजूमनपासून ते सीमीपर्यंत आणि अल-कायदापासून ते इसिसपर्यंत अनेक अतिरेकी, दहशतवादी आणि धर्मांध संघटनांचे काही ना काही लागेबांधे गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या विविध भागात निर्माण झाल्याचे अनेकवेळा स्पष्ट झालेले आहे. इसिसने सीरियासारख्या ठिकाणी पाळेमुळे रोवायला जरा कुठे सुरुवात केली होती, त्याचवेळी या धर्मांध आणि दहशतवादी संघटनेची पाळेमुळे मुंबईच्या आसपास रुजायला सुरुवात झाली होती, हे उघड सत्य आहे. याच परिसरातील काही धर्मवेड्या तरुणांना हाताशी धरून इसिसने इथेही आपला पाया रोवायचे प्रयत्न फार पूर्वीपासून सुरू केलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील ‘पडघा-बोरिवली’ हे त्याचे अगदी अलीकडील ढळढळीत उदाहरण!

इसिसचा घातक चंचुप्रवेश!

ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली या संपूर्ण गावालाच इसिसचे ठाणे बनविण्याचा घातक प्रयत्न इथल्याच काही देशविघातक शक्तींनी केलेला होता. इसिसच्या भारतातील शिरकाव्याचे हे पहिलेच उदाहरण होते. भारतात इस्लामी जिहादला अनुसरून घातपाती कारवाया करून अराजकता निर्माण करण्याचा या संघटनेच्या म्होरक्यांचा उद्देश होता. पण, एनआयएच्या कारवाईत त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. अधूनमधून याच धुळीतूनही पुन्हा पुन्हा इसिसचे नवे कोंब डोकावताना दिसतायत, हे राज्यासाठी घातक आहे. पडघा-बोरिवली पाठोपाठ राज्यात बहुतेक शहरांमध्ये आपल्या ‘स्लिपर सेल’चे जाळे विणण्याचा त्यांचा इरादा होता. या मंडळींनी मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी जाऊन रेकी केली होती. या लोकांना विदेशातून पैसा मिळत होता. गर्दीच्या ठिकाणी

ड्रोनद्वारे हल्ला करण्याची त्यांची योजना होती. त्यांना ड्रोन हल्ला करण्याचे प्रशिक्षणही दिले जात होते. साकिब नाचन हा काही माथेफिरू आणि धर्मांध तरुणांना भडकावून त्यांना इसिसमध्ये भरती करत होता. संघटनेत सहभागी होणार्‍या तरुणांना तो एकनिष्ठतेची शपथ देत होता. विशेष म्हणजे जो साकिब इथेच राहतो, जो इथल्याच मातीशी बेईमानी करतो, तो आपल्या तरुणांना ‘एकनिष्ठ’ राहण्याची शपथ देत होता, हे विशेष! एनआयएने पडघा-बोरिवली गावात छापेमारी केल्यानंतर 68 लाखांची रोख रक्कम, 1 पिस्तूल, 2 एअरगन, 10 मॅगझिन, 8 तलवारी, इसिस व हमासचे 51 झेंडे, 38 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले होते. तसेच 14 जणांना एनआयएने ताब्यात घेतले होते.

पुणे कनेक्शन!

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातील कोंढवा आणि मोमीनपुरा परिसरात छापा टाकून 15 संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मोबाईल फोन, धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डिस्क जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसांतच पुण्यातील कोथरूड परिसरातून पुणे पोलिसांनी इमरान खान आणि मोहम्मद साकी या दोन दहशतवाद्यांना पकडलं होतं. त्यांच्याकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य सापडलं होतं. शिवाय त्यांनी पुणे जिल्ह्यातील काही जंगलात जाऊन बॉम्ब ब्लास्ट केल्याचंदेखील समोर आलं होतं. वानगीदाखल दिलेली ही एक-दोन उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आजपर्यंत दहशतवादी कारवायांसाठी अटक करण्यात आलेले बहुतांश आरोपी हे उच्चशिक्षित असल्याचे दिसून येते. पूर्वी दहशतवादी आणि शिक्षण यांचा तसा फारसा संबंध आढळून येत नव्हता; पण अलीकडे दहशतवादीच उच्चशिक्षित झालेले दिसतायत. याचा अर्थ या लोकांना इथे ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’ रुजवायचे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

शेकडो कारवाया!

मात्र मागील पाच-दहा वर्षांतील महाराष्ट्रातील देशविघातक कारवायांचा आढावा घेता मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, छ. संभाजीनगर, नागपूर आदी राज्यांच्या प्रमुख शहरांमध्ये अशा देशविघातक शेकडो कारवाया उघडकीस आल्या असून, दहशतवादी कारवायांशी निगडित असे किमान शे-दीडशे लोक जगाआड झाले आहेत; पण त्यामुळे राज्यातील देशविघातक कारवाया थंड पडल्या आहेत, अशातला भाग नाही तर रोज कुठे ना कुठे वेगळ्या रूपात ही देशद्रोही पिलावळ आपले डोके वर काढताना दिसत आहे. कधी इसिसचा मुखवटा धारण करून, कधी अल-कायदाचा झेंडा खांद्यावर घेऊन, कधी पाकिस्तानचा झेंडा नाचवून तर कधी हमासचा गजर करून ही पिलावळ वेळोवेळी आपले इरादे जगजाहीर करताना दिसत आहे. राज्यातील कुठलेही शहर आणि राज्यातील कुठलाही विभाग या असल्या कारवायांपासून अलिप्त राहिलेला नाही, हे वारंवार दिसून आलेले आहे. त्यामुळे तर राज्याच्या सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून हे अधिक धोकादायक समजायला हवे.

एकेकाळी कायदा-सुव्यवस्थेच्या द़ृष्टिकोनातून देशातील सर्वाधिक सुरक्षित राज्य असलेल्या महाराष्ट्रात आजकाल कुठे ड्रग्ज, कुठे शस्त्रांचे साठे सापडू लागले आहेत, कुठे बनावट नोटांची थप्पीच्या थप्पी छापली जाताना दिसत आहे, कुठे परदेशी घुसखोरांसाठी सुरक्षित निवारास्थाने उभारण्याचे उद्योग सुरू असलेले दिसतायत. इथे राहून भारताचे शत्रू असलेल्या राष्ट्रांचे गोडवे गाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि नेमकी तीच बाब राज्याच्या सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून चिंताजनक आहे. त्यामुळे तर भविष्यात राज्यातील सुरक्षा दलांसह सर्वांनीच ‘अलर्ट’ राहण्याची आवश्यकता आहे.

खानदानच अतिरेकी!

पडघा येथे मुंबईच्या घाटकोपर बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साकिब नाचन राहतो. दहा वर्षे कारागृहात राहून बाहेर आलेल्या नाचन आणि त्याच्या कुटुंबातील काही जणांनी पुन्हा अतिरेकी कारवाया सुरू केल्याचे एनआयएच्या 2023 सालच्या डिसेंबरमधील तपासात उघड झाले होते आणि त्यानंतर साकिब याचा मुलगा शामिल नाचन आणि भाऊ आकिब नाचन यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. साकिब नाचन हा 2002 आणि 2003 मधील मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी आहे. त्याला दहा वर्षे शिक्षा झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news