

म्हसळा : म्हसळा तालुक्यातील वरवठणे गावानाजीक भरधाव कारने एका बाईकस्वाराला पाठीमागून जोरदार धडक देऊन चिरडल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.26) दुपारी घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माणगाव-म्हसळा दिघी हा पूर्वीचा अरुंद रस्ता आता नव्याने सुपरफास्ट हायवे विकसित झाला आहे. त्यामुळे या हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन भागातील धार्मिक तीर्थक्षेत्र व समुद्रकिणारे, चौपाटी अशी पर्यटनीय परिसर पाहण्यासाठी आणी आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून व देश विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. जेवढ्या वेगाने पर्यटक येत आहेत तेवढ्याच वेगाने पर्यटकांच्या गाड्या सुद्धा येत आहेत
एकंदरीत या भागात पर्यटकांच्या गाड्यांचा वेग वाढलेलाच दिसून येत असतो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी हरिहरेश्वर येथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पर्यटकांनी गोंधळ घालून हॉटेल मालकाच्या एका नातेवाईक महिलेला गाडी खाली चिरडल्याने त्याठिकाणी महिलेचा मृत्यु झाला असल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता म्हसळा येथे वरवठणे गावाजवळ भीषण अपघाताच्या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निळ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने गणेशनगर येथील रहिवाशी रमेश कांबळे यांना पाठीमागून जोरदार धडक दिली असल्याने या अपघातात रमेश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक त्याठिकाणी जमा झाले होते. म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कहाळे व कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविछेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे पाठविण्यात आले.
म्हसळा बाजूकडून बोर्ली दिवेआगरकडे मारुती सुझुकी स्विप्ट कार क्रमांक एमएच ०३- एझेड ९८६६ भरधाव वेगाने जात असताना पुढे जाण्याच्या प्रयत्नात कारचालकाने होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच ०६- सीई १७११ दुचाकी चालकाला मागाहून जोरदार ठोकरून फरफटत नेल्याने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताने वाहतूक विस्कळीत झाली.
सदरचा अपघात वरवठणे गावानजीक शनिवारी (दि.26) दुपारच्या सुमारास घडला असून बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे. निळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार चालक (आरोपी) दिवेआगर येथील असून या अपघात प्रकरणी गुन्हा नोंद करून पुढील कारवाई सुरु आहे,
संदीप कहाळे, पोलीस निरीक्षक